संग्रहित फोटो
पुणे : बाजीराव रस्त्यावर दुपारी तिघांनी अल्पवयीन मुलाचा खून केल्यानंतर आरोपींचा माग काढण्यासाठी धावधाव पोलिस करत असताना तसेच परिसरातील सीसीटीव्हींची पडताळणी केल्यानंतर मोक्याच्या ठिकाणचा तिसरा डोळा बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणेतील गंभीर त्रुटी पुन्हा उघड झाल्या आहेत. यासोबतच अनेक ठिकाणचे सीसीटीव्हीही बंद असल्याचे वारंवार समोर आले आहे. सुदैवाने काही खासगी आस्थापनांच्या कॅमेऱ्यांचे डोळे उघडे असल्याने ही घटना कैद झाली असून, त्या आधारे तपास करून आरोपींना पकडले.
मंगळवारी भरदुपारी जुन्या वादातून खुनाची घटना घडली. दुचाकीवरून जाणाऱ्या अल्पवयीनाला तिघांनी वार करून संपविले. बाजीराव रस्त्याशेजारील गजबजल्या ठिकाणीच ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीत मात्र, पालिकेचा महत्त्वाचा कॅमेरा बंद असल्याचे दिसून आले. हा कॅमेरा कार्यरत असता, तर आरोपींचा चेहरा, त्यांची दुचाकी, हल्ल्याची वेळ व दिशेचा मागोवा मिळू शकला असता. मात्र, तो बंद असल्याने पोलिसांची काही वेळ तारांबळ उडाली. पोलिसांनी खासगी आस्थापनांची पडताळणी केली. नंतर सुदैवाने एका घरावरील सीसीटीव्ही पाहिले. तेव्हा ही घटना त्यात कैद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना काहीशी माहिती मिळाली. त्यातून पोलिसांनी आरोपी पकडले. मात्र, या घटनेतून शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेची वास्तविक स्थिती उघड झाली आहे.
गुन्ह्यांची दृश्य नोंदच नाही
पुण्यातील अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रण, गुन्हेगारी प्रतिबंध आणि कायदा सुव्यवस्थेसाठी बसवलेले कॅमेरे बंद किंवा अंशतः कार्यरत आहेत. परिणामी, गुन्हेगारीसह सिग्नल तोडणे, ओव्हरस्पीडिंग, एकेरीतून जाणे, बेकायदेशीर पार्किंग यांसारख्या नियमभंगांची नोंद होत नाही. त्याबरोबर रस्त्यावरचे अपघात, चोरी, हाणामाऱ्या, टोळक्यांची हालचाल आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या गुन्ह्यांची दृश्य नोंद उपलब्ध होत नाही.
महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
काही ठिकाणी अंधाऱ्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने महिलांच्या सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही कॅमेरे वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद आहेत, काहींच्या केबल्स तुटलेल्या आहेत, तर काहींचा नेटवर्क आणि रेकॉर्डिंग सिस्टम बंद आहे. परिणामी, तपास आणि वाहतूक नियंत्रणाची संपूर्ण साखळी विस्कळीत झाली आहे.
सुरक्षेचे डोळेच बंद झाल्यास शहर सुरक्षित कसे?
खडक पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी आसपासच्या खासगी सीसीटीव्हींचा आधार घेतला. मात्र, घटनास्थळावरील महत्त्वाचा कॅमेरा बंद होता. संबंधित कॅमेरा पालिकेचा असून अनेक दिवसांपासून बंद असल्याची माहिती आहे. “शहराच्या सुरक्षेचे डोळेच बंद असतील तर गुन्हे रोखणार कसे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.






