बालविवाहाची समस्या आजही कायम! नियोजित बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश (फोटो सौजन्य-X)
ठाणे : बालविवाह रोखण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेळुक कातकरी वाडी येथे नियोजित असलेला बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यशस्वीरित्या रोखण्यात आला. या कारवाई दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरेश गावित (कसारा पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या प्रतिनिधी दिपाली कांबळे, सेवा सामाजिक संस्थेचे सुरेखा विशे, पर्यवेक्षिका कसारा-१, तसेच मुख्य सेविका कविता जगताप (बीट – कसारा १, प्रकल्प – डोळखांब) यांनी संयुक्तरीत्या तात्काळ कारवाई करत बालविवाह थांबवला. विशेषतः मुख्य सेविका कविता जगताप यांनी प्रकरणाची माहिती मिळताच तत्परतेने प्रयत्न करून मोठ्या मेहनतीने हा बालविवाह थांबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्याच्या कार्यवाहीबाबतची आकडेवारी
वर्ष 2024: १८ बालविवाह प्रकरणे रोखण्यात आली
वर्ष 2025 (आजअखेर): ६ प्रकरणे यशस्वीरित्या रोखण्यात आली.
ही आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यातील जनजागृती उपक्रम आणि प्रशासनाची तात्काळ कृती यामुळे बालविवाह प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
या यशस्वी हस्तक्षेपाबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी संपूर्ण पथकाचे व विशेषतः कर्मचारी व संबंधित अधिकार्यांचे कौतुक करताना म्हटले की, “बालविवाहासारख्या सामाजिक संकटांवर प्रभावीपणे कारवाई करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. वेळेवर कृती करून एका बालिकेचे भविष्य वाचवणाऱ्या संपूर्ण पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
बालविकास विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व स्वयंसेवी संस्थांनी दाखवलेली एकात्मता आणि सजगता ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. जिल्हा परिषद, ठाणे मार्फत सहकार्य व जनजागृतीचे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असून ग्रामस्थांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
कायद्यानुसार, कोणत्याही मुलाचा विशिष्ट वयाच्या आधी विवाह करणे, म्हणजेच अल्पवयीन वयात मुलाशी लग्न करणे, हे बालविवाह आहे. प्रत्येक देशात मुलाला प्रौढ होण्यासाठी एक विशिष्ट वय निश्चित केले आहे; त्या वयाच्या आधीच्या लग्नाला बालविवाह म्हणतात. या लग्नामुळे मुलांचे बालपण हिरावून घेतले जाते आणि भविष्यात त्यांचे काय होणार आहे किंवा त्यांचे आयुष्य कसे असेल याची त्यांना काहीच कल्पना नसते.
या प्रथेला बळी पडणाऱ्या बहुतेक मुली आहेत कारण अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की मुलींचे वय खूप कमी असते आणि मुलांचे वय त्यांच्यापेक्षा खूप जास्त असते. या प्रकारच्या लग्नामुळे मुलींना आयुष्यभर मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. भारतात, कायदेशीररित्या, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा विवाह बालविवाहाच्या श्रेणीत येतो, जो कायदेशीर गुन्हा आहे.






