मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात (फोटो- टीम नवराष्ट्र)
भोस्ते घाटाच्या पायथ्याशी झाला भीषण अपघात
कंटेनरने दिली तीन वाहनांना धडक
जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू
खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने पुढील आणि मागील अशा तीन चारचाकी वाहनांना तसेच एका दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात महिंद्रा पिकअप, टाटा नेक्सॉन, स्विफ्ट डिझायर आणि एक दुचाकी यांचा समावेश आहे. तिन्ही चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्विफ्ट डिझायर कारमधील दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांच्या सहकार्याने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंना मोठी वाहतूक कोंडी झाली. कंटेनरमधील केमिकलसदृश द्रव पदार्थ महामार्गावर सांडल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली होती. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिस, महामार्ग वाहतूक पोलीस व लोटे पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, वेरळ परिसरातील महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे अपूर्ण आहे. त्यामुळे या ठिकाणी सतत अपघात घडत आहेत. “अपूर्ण महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार?” असा संतप्त प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
रुळ ओलांडताना दोन तरुणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाळधी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी अहमदाबाद हावडा एक्सप्रेस खाली येऊन दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतदेह आढळून आलेल्या दोन्ही तरुण नात्याने मामा भाचे होते. दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांच्यात मित्रा सारखे नाते होते. या दोघांच्या मृत्यने परिसरात .हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे लाईनवर मोबाईलवर रील बनवतांना भरधाव एक्सप्रेसच्या खाली आल्याने या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची चर्चा होत आहे. मात्र रील बनवतांना नव्हते तर कामासाठी जात असताना रेल्वे खाली आल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव प्रशांत पावन खैरनार आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे आहे. हे दोघेही जळगाव जिल्ह्यातील पारधी गावातल्या महात्मा फुले नगर मधील रहिवासी आहे. प्रशांत हा दहावीत होता तर हर्षवर्धन हा अकरावी वर्गात शिकत होता. या दोन्ही तरुणांनाचा अहमदाबाद हावडा एक्सप्रेस खाली रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दिवाळीच्या सुट्टीमध्ये काही काम करून कुटुंबियांना दिवाळीचे कपडे व भेटवस्तू द्याव्या यासाठी ते काम करत होते. रविवारी कामावर जात असतांना रेल्वे लाईन ओलांडताना ते भरधाव एक्सप्रेस खाली आले. आणि घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला.






