संग्रहित फोटो
कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गोळीबार प्रकरणात घायवळ टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. परदेशात गेलेल्या घायवळने ९० दिवसांचा व्हिस्सा मिळवला आहे. याबाबत ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले असून, घायवळ व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती युके हाय कमिशनकडून पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी घायवळला फरार घोषित करण्यात यावा, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. पोलिसांचा अर्ज मंजूर झाल्याने आता त्याच्या प्रत्यर्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल.
‘ब्लू कॉर्नर’ नोटीस बजावली
घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला ‘लूक आउट नोटीस बजाविली होती. त्यानंतर ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजाविण्यात आली होती. तर नुकतीच पुणे पोलिसांनी ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस देखील बजावली आहे. घायवळ मूळचा अहिल्यानगरमधील जामखेडचा रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नीलेश घायवळने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने घेतलेल्या सिमकार्डचा वापर केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र काढून प्रशासनाची फसवणूक करण्यासह इतर गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने घायवळला फरारी घोषित केले आहे. या निर्णयामुळे त्याची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे. – संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन.
तीन गुन्ह्यात दोषारोपपत्र
गोळीबार प्रकरणानंतर निलेश गायवळ याच्यावर वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान यातील दुसऱ्याच्या नावे सिम कार्ड वापरल्या प्रकरणी, बनावट नंबर प्लेट गाडी वापरणे व घरात काडतुसे सापडल्याप्रकरणी या तीन गुन्ह्यात पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.






