18 Aug 2025 05:10 PM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लॉटमध्ये टाकलेला राडारोडा काढण्यास सांगितल्यावरून दगडाने व लाकडी बांबुने एकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रघुनाथ ढोकले (४५, रा. करंदीता, शिरूर, जि. पुणे) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश मोहन खुटवड (४०, रा. मु. पो. टाकळी भिमा, ता. दौंड, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार वाघोली बकोरी रोड येथील श्रीरामचंद्र व्हिला जवळ घडला आहे.
18 Aug 2025 04:50 PM (IST)
पुण्यात अमली पदार्थांची आवक सुरूच असून, तस्कारांकडून सातत्याने अमली पदार्थांसाठा पुण्यात आणून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांकडून काही तस्कारांना पकडण्यात यश येत असले तरी यामधून पुण्यातील ड्रग्जची तस्करी सुरूच असल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोन व गुन्हे शाखेच्या युनिट सहाने वाघोलीत कारवाई करत ७६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त केले असून, येथून ३५१ ग्रॅम ५०२ मिलीग्रॅम जप्त केले आहे. रामेश्वरलाल मोतीजी आहिर (४५) आणि नक्षत्र हेमराज अहिर (२५, दोघेही रा. अहिल मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, चित्तोडगड, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलिस निरीखक वाहीद पठाण, पोलिस अमंलदार कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
18 Aug 2025 04:50 PM (IST)
मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनवरुन निघालेली मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्ष देणारी श्रीमंत प्रथम रघुजीराजे भोसले यांची तलवार आता महाराष्ट्रात, मुंबईतील पु, लं. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रांगणात आलेली आहे. याचे आता दस्तावेजीकरण होईल. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत या तलवारीच्या लोकार्पणाचा सोहळा होईल. त्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, शिवप्रेमींना दर्शनासाठी ही तलवार खुली होईल.
18 Aug 2025 04:30 PM (IST)
वालचंदनगर भागात दहशत माजविणारा तसेच ग्रामीण भागातील कुख्यात गुंड राजू भाळे याच्यासह १३ जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुनहेगारी नियंत्रण कायदा) कारवाई केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी हे आदेश दिले आहेत. राजू भाळे टोळीवर पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात यापूर्वी बेकायदा पिस्तूल, कोयते, तलवार बाळगून दहशत माजविणे, दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी करणे असे गंभीर स्वरुपाचे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. टोळीविरुद्ध मकोका अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गुन्ह्याची कागदपत्रांची पडताळणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्याकडे सोपविला आहे.
18 Aug 2025 04:05 PM (IST)
सिंहगडरोड येथील आनंद विहार येथील शिवनेरीमधील एका घराचे लॉक तोडून तर तळमजल्यावरील ब्युटीपार्लरचे कुलुप तोडून चोरटयाने ४ हजारांची रोकड चोरी केली आहे. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते १६ ऑगस्ट दरम्यान सकाळी १० वाजता घडला आहे. याबाबत किरण सुदामराव पेडगावकर (४८, रा. आनंदविहार कॉलनी, हिंगणे खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान कोंढव्यात काकडेवस्ती येथे अत्तर हाईट्समधील सदनिकेचा दरवाजा उघडून दोन अनोळखी मुलांनी लोखंडी कपाटातील १ लाख २० हजारांची रोकड चोरी केली आहे. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत सुचेंद्र चोखंद्रे (३२, अत्तर हाईट्स, काकडेवस्ती, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
18 Aug 2025 03:50 PM (IST)
पुणे शहरात पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा तसेच बसमध्ये बसताना प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटना सुरूच असून, कर्वे रोड परिसरात पीएमपी बस थांब्यावर बसमध्ये चढताना ज्येष्ट महिलेकडील ६० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय महिलेच्या ६९ वर्षीय पतीने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
18 Aug 2025 03:30 PM (IST)
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी लागू असलेल्या स्कूलबस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ०१ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या चार महिन्यांत विशेष मोहिम राबवून कारवाई केली आहे. या कालावधीत एकूण ६३३ वाहने तपासली आहेत. त्यापैकी १८१ वाहनांवर नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई केली असून, ०७ वाहने जप्त केले आहेत. यामधून १८ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
18 Aug 2025 03:20 PM (IST)
कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने तब्बल सहा वर्षे आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ४४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
18 Aug 2025 03:15 PM (IST)
अमली पदार्थ तस्कर, टोळ्यांचे प्रमुख, कुख्यात गुन्हेगार अन् रस्त्यावर दहशत माजविणाऱ्यांवर जरब बसविण्यास यशस्वी ठरलेल्या पुणे पोलिसांना मात्र, ‘पाहिजे व फरार’ आरोपींच्या मुसक्या आवळल्यात सपशेल अपयश येत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षातील स्थिती पाहता या गुन्हेगारांची संख्या कमी होण्यापेक्षा ती साडे चारशेंने वाढली आहे. त्यासोबतच मोक्कात गेल्या काही वर्षात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मोक्कातील देखील तब्बल ४३ गुन्हेगार शोधायचे आहेत. पुणे पोलिसांना तब्बल ३ हजार गुन्हेगार हवे आहेत. यात २ हजार ९३३ “पाहिजे” अन् ४८ “फरार” आरोपी आहेत. ही संख्या गेल्या दोन वर्षात वाढली आहे. सहसा ही संख्या वर्षाला कमी होणे अपेक्षित आहे. पण, फरार व पाहिजे आरोपींचा शोध लागत नसल्याचे दिसत आहे.
18 Aug 2025 03:08 PM (IST)
मुंबई: राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
18 Aug 2025 03:00 PM (IST)
गेल्या आठवड्यात एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला होता. गेल्या रविवारी दुपारी नागपुर-जबलपुर नॅशनल हायवेवर एक भयानक अपघातझाला. ट्रक चालकाने धडक दिल्यामुळे एक महिला बाईकवरून कोसळली आणि ट्रकखाली चिरडून तिचा मृत्यू झाला.मदतीला कोणीच थांबलं नाही म्हणून त्या पतीने निराश होऊ पत्नीचा मृतदेह बाईकच्या मागे बांधला आणि तो तसाच मध्यप्रदेशमधील त्याच्या गावी निघाला.ज्या ट्रक ड्रायव्हरमुळे हा अपघात झाला, त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. ‘एआय’च्या मदतीने पोलिसांनी 15 मिनिटांत आरोपी शोधला. सत्यपाल राजेंद्र असे ट्रकचालकाचे नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील महोई येथून ताब्यात घेण्यात आलं .
18 Aug 2025 02:40 PM (IST)
इंदूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. लक्झरी बसचे टायर फुटल्यानंतर अचानक बसला आग लागल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई आग्रा रोडवरील आडगाव येथील हॉटेल स्वागत समोर हा अपघात झाला. त्यावेळी बसमध्ये 39 प्रवासी होते. सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
18 Aug 2025 02:25 PM (IST)
राजस्थानमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.रविवारी खोलीच्या छतावर ठेवलेल्या निळ्या प्लास्टिक ड्रममधून ३५ वर्षीय तरुण हंसरामचा मृतदेह सापडला आहे. ड्रममध्ये तरुणाचा मृतदेह सापडताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्याला ड्रममध्ये घालून वरुन मीठ टाकण्यात आलं. जेणेकरून मृतदेहातून येणारा वास बाहेर पसरू नये आणि मृतदेह बराच काळ लपवता येईल. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मृताची पत्नी आणि तिन्ही मुलं बेपत्ता आहेत.
18 Aug 2025 02:10 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरच्या एन-7 सिडको परिसरात एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 14 जणांचे लचके तोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. या मोकाट कुत्र्याला पकडण्यासाठी मनपाच्या पथकाशी संपर्क साधल्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
18 Aug 2025 02:05 PM (IST)
पर्वतीमधील लक्ष्मीनगर येथे किरणा स्टोअरमध्ये खरेदीसाठी निघालेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. हा प्रकार सहकारनगर २ येथील तुळशीबाग कॉलनीवाले येथे मानसी अपार्टमेंट समोर घडला. याप्रकरणी श्रृती उमेश जाधव (३५, रा. चिंतामणी अपार्टमेंट, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार, दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
18 Aug 2025 01:40 PM (IST)
नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात बलात्काराच्या आरोपीचे सोन्याचे दागिने चक्क पोलिसांनी घेतल्याचा आरोपीकडून आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने संबंधित पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाला चौकशीचे आदेश दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोप करणारा आरोपी याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तो गिटार प्रशिक्षण अकॅडमीमध्ये येणाऱ्या अल्पवयीन तरुणीसोबत बलात्कार केल्याचा आरोप आरोपीवर आहे. सागर सिंग उर्फ सॅमसन परोसिया असे या आरोचे नाव असून त्याने सोनेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कराडकर यांच्यावर सोन्याचे दागिने घेतल्याचा गंभीर आरोप लावलाय.
18 Aug 2025 01:20 PM (IST)
राज्याचे महसूल मंत्री असल्याचे सांगत शेतकऱ्याला पैश्यांची मागणी करत फसवणूक करण्यात आल्याचे समोर आलं आहे. अज्ञात व्यक्तीने आधी फोन करून बावनकुळे साहेबांचा पीए असलयाचे सांगितले त्यानंतर तुमचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर स्कॅनर पाठवत पैश्यांची मागणी करण्यात आली. शेतकऱ्याला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात धाव घेतली. या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
18 Aug 2025 01:06 PM (IST)
नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक असलेल्या पुणेकराला सायबर चोरट्यांनी ४५ लाखांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘त्याच्या नावाने भारतात आधार आणि सिमकार्ड वापरून बँक खाते उघडले. या खात्यांद्वारे अवैध आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात त्याच्यावर ‘डिपोर्टेशन ऑर्डर’ असल्याचे सांगून त्याला धमकावून बँक खात्यांची पडताळणीचा बहाणा करून ४५ लाख रुपये स्वत:कडे ट्रान्सफर करून घेतले आहेत. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या ७० वर्षीय वडिलांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
18 Aug 2025 12:45 PM (IST)
पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर रिव्हरव्ह्यू सिटीने पाईपलाईनसाठी बेकायदा खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरूवारी (दि. ७) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अपघातात जखमी झालेल्या तरुणांमध्ये वेदांत सावंत आणि आदित्य सुरेश आटोळे (दोघेही पांडवदंड, कदमवाकवस्ती) यांचा समावेश आहे. आदित्यवर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
18 Aug 2025 12:25 PM (IST)
कराड शहरासह मलकापूर परिसरात बेकायदेशीर विनापरवाना घरगुती गॅस रिक्षात भरण्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. त्यात अशातच आता सैदापूर कॅनॉल ते मसूर जाणाऱ्या रोडवर सूर्या मस्तानी कॅफेच्या पाठीमागील बाजूला बेकायदेशीर विनापरवाना घरगुती गॅस टाकीतून पाईपच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरताना पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार महेश शिंदे यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्निल सुनिल यादव (वय २८, रा. सैदापूर कॅनॉल, ता. कराड) व शिवाजी जाधव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
18 Aug 2025 12:04 PM (IST)
चार टक्के व्याजाने पाच लाख घेऊन त्याचे व्याज २ लाख १० हजार देऊनही त्रास देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पैसे नसतील तर बायकोला दुसर्या धंद्यात घाल अशा पद्धतीने अश्लिल बोलत मनास लज्जा होईल असे वर्तन केले आहे. या प्रकरणात सावकारी करणार्यावर सावकारी आणि अॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल लक्ष्मण काळभोर (रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर) आणि विशाल विठ्ठल काळभोर (रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ४७ वर्षीय अनुसुचित जातीच्या महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२० ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे.
राजधानी दिल्लीत आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून मुलाने 65 वर्षीय आईवरच दोनवेळा अत्याचार केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. आपल्या आईला चरित्रहीन असल्याचे सांगत वडिलांपासून वेगळं होण्यास भाग पाडलं. नराधम मुलाने आधी वडिलांपासून घटस्फोट घेण्यासाठी आईवर दबाव टाकला, त्यानंतर आईवरच दोनवेळा अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल होताच 39 वर्षीय आरोपी मुलास पोलिसांनी (police) अटक केली आहे.