संग्रहित फोटो
पुणे : वालचंदनगर भागात दहशत माजविणारा तसेच ग्रामीण भागातील कुख्यात गुंड राजू भाळे याच्यासह १३ जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुनहेगारी नियंत्रण कायदा) कारवाई केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी हे आदेश दिले आहेत.
वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार
राजेंद्र ऊर्फ राजू महादेव भाळे (वय ३०, रा. खोरोची, ता़ इंदापूर), रामदास ऊर्फ रामा शिवाजी भाळे (वय २६, रा. खोरोची, ता़ इंदापूर), शुभम ऊर्फ दादा बापू आटोळे (वय १९, रा. शेळगाव, ता. इंदापूर), स्वप्नील ऊर्फ बालाजी बबन वाघमोडे (वय २५, रा. रेडणी ता. इंदापूर), नाना भागवत भाळे (वय २८, रा. खोरोची, ता. इंदापूर), निरंजन लहु पवार (वय २७, रा. खोरोची, ता. इंदापूर), तुकाराम ज्ञानदेव खरात (वय ३०, रा. खोरोची, ता. इंदापूर), जिजा ऊर्फ मयुर मोहन पाटोळे (वय ३०, रा. निमसाखर, ता. इंदापूर), अशोक बाळु यादव (वय ३०, रा. शेळगाव, ता. इंदापूर), धनाजी गोविंद मसुगडे (वय ३८, रा. कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघे फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भाळे याच्यासह १० जणांना अटक
पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस कर्मचारी महेश बनकर, अभिजित कळसकर यांनी ही कारवाई केली आहे. खोरोचीतील कुख्यात गुन्हेगार राजू भाळे आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी उत्तम जाधव यांचा खून केला होता. या खुन प्रकरणात राजू भाळे याच्यासह १० जणांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
गंभीर स्वरुपाचे एकूण १५ गुन्हे दाखल
राजू भाळे टोळीवर पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात यापूर्वी बेकायदा पिस्तूल, कोयते, तलवार बाळगून दहशत माजविणे, दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी करणे असे गंभीर स्वरुपाचे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. टोळीविरुद्ध मकोका अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गुन्ह्याची कागदपत्रांची पडताळणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्याकडे सोपविला आहे.