संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा तसेच बसमध्ये बसताना प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटना सुरूच असून, कर्वे रोड परिसरात पीएमपी बस थांब्यावर बसमध्ये चढताना ज्येष्ट महिलेकडील ६० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय महिलेच्या ६९ वर्षीय पतीने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला मूळच्या अहिल्यानगरमधील आहेत. त्या कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. कर्वे रोडवरील पीएमपी थांब्यावर त्या थांबल्या होत्या. बस आल्यानंतर बसमध्ये बसत असताना त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्यांनी कटरचा वापर करुन लांबविली. सहायक फौजदार गमाले अधिक तपास करत आहेत.
तर, स्वारगेट पीएमपी स्थानकाच्या आवारात महिलेच्या पिशवीतून ३३ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत ४४ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला लोहगावमध्ये राहतात. त्या स्वारगेट स्थानकातून पीएमपी बसने निघाल्या होत्या. तेव्हा चोरट्याने त्यांच्या पिशवीतून रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, हडपसर भागातील पीएमपी स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये प्रवेश करुन चोरटे ऐवज लांबवितात.
हिंगणे व कोंढव्यात घरफोडी
राज्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे घरे फोडून लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारत आहेत. सिंहगडरोड येथील आनंद विहार येथील शिवनेरीमधील एका घराचे लॉक तोडून तर तळमजल्यावरील ब्युटीपार्लरचे कुलुप तोडून चोरटयाने ४ हजारांची रोकड चोरी केली आहे. याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते १६ ऑगस्ट दरम्यान सकाळी १० वाजता घडला आहे. याबाबत किरण सुदामराव पेडगावकर (४८, रा. आनंदविहार कॉलनी, हिंगणे खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान कोंढव्यात काकडेवस्ती येथे अत्तर हाईट्समधील सदनिकेचा दरवाजा उघडून दोन अनोळखी मुलांनी लोखंडी कपाटातील १ लाख २० हजारांची रोकड चोरी केली आहे. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत सुचेंद्र चोखंद्रे (३२, अत्तर हाईट्स, काकडेवस्ती, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.