अलिबाग : ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या अॅप्सपासून लांब राहण्याचं आवाहन आणि जनजागृती सायबर क्राईमच्या वतीने कायमच करण्यात येते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या आधुनिक जगात सर्वात जास्त सायबर हल्ले होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या अॅप्सच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक करणा-या एका रॅकेटचा पर्दाफाश रायगड सायबर पोलीसांनी केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तब्बल 44 म्युल बँक खात्यांमधील तब्बल 19 कोटी 44 लाखांहून अधिक रक्कमवर पोलीसांनी स्थिगिती आणली आहे.
अलिबाग येथील अमित बापू जाधव (वय 37) यांना मोबाईलवर वारंवार ऑनलाइन गेमिंग अॅप्सची जाहिरात दिसत होती. कायदेशीर असल्याचा भास झाल्याने त्यांनी AM999, माधुर मटका, PARIMATCH ही अॅप्स डाऊनलोड करून त्यात 10,000 रुपये गुंतवले. मात्र त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांनी तपासात 25 पेक्षा जास्त ऑनलाईन गेमिंग अॅप्स उघड केले आहेत. यात AM999, Madhur Matka, PARIMATCH, BETVIBE, Casinodays, Bluechip, 1XBET, Teenpatti, Forex, 4rabet यांसारख्या लोकप्रिय नावांचा समावेश आहे. हे सर्व अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर सहज उपलब्ध असल्याने अनेकांना ते कायदेशीर वाटत होते.
एकूण 44 म्यूल बँक खाती गोठवली
गोठविलेली रक्कम – ₹19,44,03,493
आरोपी भारमल हनुमान मिना (रा. राजस्थान) अटक
आणखी 5 आरोपींचा शोध सुरू
आरोपीच्या नातेवाईकांच्या खात्यातून रोज जवळपास ₹1 लाख कमाई
फसवणुकीतून अल्पवयीन मुलांचादेखील सहभाग
फिर्यादी व इतर साक्षीदारांनी IDFC बँकेच्या भुवनेश्वर शाखेतून 50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले. तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या –
Payque Solutions (सुझाता साहू) च्या खात्यात 114 कोटींचे व्यवहार
La Pitura (सौभाग्य रंजन बेहेरा) च्या खात्यात 186 कोटींचे व्यवहार
New3g Service (रामकांत साहू) च्या खात्यात 56 कोटींचे व्यवहार
यामध्ये APEXIO Ltd. या कंपनीचे डायरेक्टर स्मितिका बोस व काही बँक अधिकाऱ्यांचादेखील सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांचा यशस्वी सापळा
सायबर पोलीस स्टेशन रायगड-अलिबाग येथील निरीक्षक रिजवाना नदाफ व सहका-यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी भारमल मिना याला राजस्थानातून अटक करण्यात आली असून, अजून पाच जणांविरोधात शोधमोहीम सुरू आहे.या संपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक आचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकरणाने रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर अजून किती लोकांचे पैसे अशा बेकायदेशीर अॅप्समध्ये अडकले आहेत याचा शोध घेतला जात आहे.