संग्रहित फोटो
पुणे : गांजा विक्रीप्रकरणात पुन्हा पोलिसांनी एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून गांजा, दुचाकी, मोबाइल असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वानवडी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. तौफिक रझाक शेख (वय २६, रा. नवाजीश चौकाजवळ, मीठानगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड व त्यांच्या पथकाने केली.
वानवडी येथील गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगर रस्त्यावर वानवडी पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पोलिस कर्मचारी विठ्ठल चोरमोले, अमोल गायकवाड हे गस्त घालत होते. शेख दुचाकीवरुन तेथे गांजा विक्रीस आला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. नंतर पोलिसांनी सापळा लावून शेखला पकडले. पोलिसांनी त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत ८१० गॅम गांजा सापडला.
हे सुद्धा वाचा : बापाचा राग काढला मुलावर, छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार; कारण काय तर…
गुटखा विक्री प्रकरणात एकाला अटक
गुटख्याची विक्री करणाऱ्यास खडक पोलिसांनी अटक केली आहे. मनीष कांतीलाल गेहलोत (वय २०, रा. डाके चौक, सुखसागरनगर, कात्रज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई आशिष चव्हाण यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवार पेठेतील गाडीखाना चौकात दुकानासमोर गेहलोत गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
गेल्या काही दिवसाखाली गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना वानवडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश श्रीरंग भोंडवे (वय ४१, रा. सिंहगड रोड) आणि संजय विश्वनाथ काथे (वय ३५, रा. वैदुवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक, अमोल पिलाणे व महेश गाढवे यांच्या पथकाने केली आहे.