सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/अक्षय फाटक : गुन्हेगारी विश्वात पाळला जाणारा एक अलिखीत नियम असतो. वैर-वैरातच ठेवायचे. कुटूंबिय, नातेवाईक, मित्र यांना स्पर्श करायचा नाही, अन् त्यांच्याकडे वाकड्या नजरेनेही पहायचे नाही. सरकारी कायद्याप्रमाणेच हा नियम प्रत्येक टोळी पाळते. मात्र, आंदेकर व गायकवाड टोळीच्या युद्धाने हा नियम मोडला आहे. गेल्या वर्षभरापासून दोन टोळ्यांच्या संघर्षाने कुटुंबियांना टार्गेट करण्याचा नवा ट्रेंड सुरू करून ‘गुन्हेगारीतला नो-फॅमिली रूल’ बाद ठरवला आहे. याच नियमभंगातून गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या दोन जणांचा बळी गेला. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ तर उडाली आहेच पण, हा नियमभंग आता आणखी किती जणांचा अशा पद्धतीने जीव घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुण्यातील गुन्हेगारीचा पॅटर्न तसा सर्वश्रुत आहे. राज्यभरात कोयता व गोळीबाराने खून करणे हा पुण्यातील गुन्हेगारीचा नवा पॅटर्न. या पॅटर्नमुळे खुनानंतर दहशतीचे सावट व निशाणी पाठिमागे ठेवली जाते. पुण्यातील गुन्हेगारी तशी लाठ्या-काठ्यांपर्यंतच मर्यादित होती. आता ती गोळीबार व कोयत्यापर्यंत गेली. पुण्याच्या गुन्हेगारीत सुरूवातीपासून आंदेकर टोळीचा सहभाग आहे. पहिली टोळी म्हणूनही या टोळीला ओळखतात. आंदेकर व माळदकर टोळीच्या संघर्षाचे आज देखील किस्से सांगितले जातात. तेव्हापासून गुन्हेगारी जगतातील वर्चस्व आंदेकर टोळीने राखल्याचे बोलले जाते. परंतु, आता गुन्हेगारीतल्या नियमभंगाची सुरूवातही याच टोळीपासून झाली म्हणावी लागेल.
गायकवाड-आंदेकर टोळीचा संघर्ष नजिकच्या काळातलाच. त्याला फार मोठा काही इतिहास नाही. आर्थिक सुबत्तेतून सोमनाथ गायकवाड-आंदेकरांत वाद-विवाद झाले. सोमनाथने स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आंदेकर टोळीशी वाद घेतला. सोमनाथ आंबेगाव पठारचा. पण आंदेकर टोळीला बऱ्यापैकी ओळखणारा. गुन्हेगारीतला ‘सुरज’ टिकण्यासाठी त्याने संवगडीसोबत घेऊन टोळी निर्माण केली. आता या दोन टोळ्यांमध्ये टोकाचे वैमन्यास्य सुरू झाले आहे.
पुर्वइतिहास..!
आंदेकर-गायकवाड टोळीत टोकाचे युद्ध पेटले ते २०२३ पासून. ऑक्टोंबर २०२३ मध्ये निखील आखाडे व अनिकेत दुधभातेवर आंदेकर टोळीकडून हल्ला झाला. त्यात निखील आखाडेचा मृत्यू झाला. तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेईल, असा अंदाज होता. त्यानूसार, १ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री वनराज याचा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून केला. आंदेकर टोळीच्या वर्मी हा घाव घातल्याची चर्चा गुन्हेगारी विश्वासह पोलिस दलात होती. त्याचा बदला घेतला जाईल असेही भाकित होते. त्यातूनच मग, ५ सप्टेंबर २०२५ रोजी वनराज याच्या खूनातील आरोपी गणेश कोमकरच्या मुलाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, गुन्हेगारीतील दोन्ही खून नियमांच्या उलटे असल्याची चर्चा आता सुरू आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार वनराज याचा गुन्हेगारीशी संबंध नव्हता. तरीही त्याचा जीव घेतला. आयुष याचाही गुन्हेगारीशी संबंध नसताना त्याला टार्गेट करून ठार मारले गेले.
नात्यातील दोघांचा बळी
आंदेकर- गायकवाड टोळीत अत्यंत जवळच्या नात्यातील दोघांचा जीव घेतला गेला. बंडू आंदेकर यांना संजीवनी, कल्याणी व वृदांवनी या तीन मुली. पहिली संजीवनी हिचा जयंत कोमकर व दुसरी कल्याणी हिचा गणेश कोमकर याच्याशी विवाह झाला. आयुष हा गणेशचा मोठा मुलगा. म्हणजे, बंडू आंदेकरचा सख्खा नातूच आणि वनराज याचा भाच्चा देखील. पण, भावाच्याच खूनात सहभाग असल्याच्या आरोपावरून बंडू आंदेकर याच्या तक्रारीवरून संजीवनी, तिचा पती, व दिर गणेश यांना अटक झाली. बहिणीने भावाला मारण्यासाठी कट रचल्याने त्याला आर्थिक देखील किनार असल्याचे बोलले जाते. या सर्वात मात्र, बंडू आंदेकरला पहिला मुलगा आणि आता नातवाला गमवावे लागले आहे.