पुणे सायबर क्राईम न्यूज (फोटो - istockphoto)
पुणे: सायबर चोरट्यांकडून पोलीस कारवाईची भिती दाखवून फसवणूक होणारे सत्र कायम असून, एका तरुणाला २१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. तरुणाला कारवाईची भिती दाखवली गेली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २७ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
माहितीनुसार, तरुण कात्रज भागात राहायला आहे. चोरट्यांनी त्याला २९ ऑक्टोबर रोजी फोनवर संपर्क साधला. तसेच अमली पदार्थ विक्री प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो-एनसीबी) कारवाई होणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी बतावणी त्याच्याकडे केली. नंतर तरुणाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने बँक खात्यात वेळोवेळी २० लाख ९० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यनंतर चोरट्यांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. चौकशीत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत महिलेसह दोघांची २९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाषाण भागातील महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी १९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी ओैंध भागातील एकाची नऊ लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली.