शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५६ लाखांची फसवणूक (फोटो- istockphoto)
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५६ लाखांची फसवणूक
२८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
५५ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक
पिंपरी: बनावट शेअर ट्रेडिंग वेबसाइट व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ५५ लाख ८२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ जुलै २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत निगडी येथे ऑनलाइन माध्यमातून घडली.
या प्रकरणातील पोलिसांनी विविध मोबाईल क्रमांकधारक व बनावट बँक खातेदार अशा २८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत शरद वैद्य (वय ४४, रुणाल बहार, निगडी, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी मंगळवारी (ता. २३) याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी प्रशांत वैद्य यांना एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यांचा विश्वास संपादन करून केलेल्या गुंतवणुकीवर खात्रीशीर नफ्याचे आमिष दाखवले. बनावट वेबसाईटद्वारे ५५ लाख ८२ हजार रुपयांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर त्यांना १४ कोटी १९ लाख ९१ हजार ५०७ रुपयांचा नफा झाल्याचे दाखविण्यात आले. फिर्यादी यांच्याकडे बँक चार्जेसच्या नावाखाली १९ लाख ८७ हजार ८८१ रुपयांची मागणी करण्यात आली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने गुंतवणूक केलेली रक्कम फ्रिज झाल्याचे सांगून आर्थिक फसवणूक करण्यात आली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.
नाशिकमध्ये दोन जणांना लावला लाखांचा चुना
नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्पिटलचा क्रमांक गुगल आणि पुढे जस्ट डायलवर शोधणे एका नोकरदार महिलेस एकास चांगले महागात पडले. सायबर चोरट्यांनी अवघ्या काही मिनीटांत या दोघांच्या बँक खात्यावरून तब्बल सव्वादोन लाख रूपये काढून घेतले. मोबाईलवर पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून बँक खात्याची माहिती मिळवीत चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकी घटना काय घडली?
हनुमाननगर भागात राहणाऱ्या नोकरदार महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. नियमीत आरोग्य तपासणीसाठी महिलेने गेल्या १८ ऑक्टोबर रोजी जस्ट डायल वर संपर्क साधून पिंप्रीकर हॉस्पिटलचा नंबर मिळवला होता. यानंतर ९३४१६७०१३४ या मोबाईल क्रमांकावरून महिलेशी संपर्क साधण्यात आला.






