सौजन्य - सोशल मिडीया
पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, अनेक प्रकरणांत सोशल मीडियावरील ओळख, मोबाईलवरील सततचा संपर्क आणि ऑनलाईन चॅटिंगमधून जवळीक वाढत असल्याचे आढळून आले आहे. काही मुली आकर्षणाला प्रेम समजून क्षणिक भावनेतून घर सोडण्याचा निर्णय घेतात. मात्र, अशा निर्णयामुळे त्यांच्या शिक्षणावर, भविष्यातील करिअरवर आणि कुटुंबीयांच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीत वाढ दिसून येत आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये त्या ओळखीच्या तरुणासोबत गेल्याचे निष्पन्न होते. पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे आणि त्यांच्या मोबाईल वापरावर संयमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे.”
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, वेब सिरीज, चित्रपट आणि सोशल मीडियावरील आशयामुळे अल्पवयीन मुलांना प्रौढ विषयांची लवकर ओळख होते; परंतु जबाबदारीची जाणीव आणि परिणामांची समज विकसित झालेली नसते. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहणे, आर्थिक अस्थैर्य आणि सामाजिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते. बारामतीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, गावपातळीवर पालक मेळावे, शाळांमध्ये जागृती अभियान आणि समुपदेशन केंद्रांची गरज आहे. “मुलांवर बंधने लादण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधणे अधिक परिणामकारक ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
पालकांनी मुलांच्या भावना समजून घ्याव्या
या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलांच्या भावना समजून घेणे, त्यांना योग्य दिशा देणे आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्यास प्रवृत्त करणे अत्यावश्यक आहे. अल्पवयीन प्रेमप्रकरणांची वाढ ही केवळ वयक्तिक नव्हे, तर सामाजिक आणि भावनिक जाणीवेची समस्या बनत चालली आहे. समाज, पालक, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रित प्रयत्न केल्यासच या घटनांना आळा बसू शकतो. कारण क्षणिक आकर्षण तात्पुरता आनंद देईल; पण विचारपूर्वक घेतलेला निर्णयच आयुष्यभर समाधान देणारा ठरेल.
“हार्मोन्सचा शारीरिक विकास लवकर होतो; मात्र भावनिक परिपक्वता त्याच वेगाने विकसित होत नाही. त्यामुळे आकर्षण आणि प्रेम यातील फरक समजून घेण्याची क्षमता कमी असते. शाळा–महाविद्यालयांमध्ये समुपदेशन सत्रे वाढवण्याची गरज आहे.” – एक प्राध्यापक, स्थानिक महाविद्यालय






