वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मोताळा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात सशस्त्र दरोडेखोरांचा प्रतिकार करताना झालेल्या मारहाणीत डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला. तर पशुवैद्यकीय डॉक्टर गंभीर जखमी झाले. ही घटना बुलढाण्याच्या मोताळा दाभाडी येथे रविवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Crime News: विवाहित पुरुषाने डॉक्टर तरुणीला दिले लग्नाचे आमिष; अन् तिच्याकडून थेट …; वाचा दुर्दैवी घटना
पोलिस अधीक्षकांसह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून, दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. माधुरी गजानन टेकाळे (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. तर डॉ. गजानन तुकाराम टेकाळे (वय ४२) असे गंभीर जखमी पशुवैद्याचे नाव असून, त्यांच्यावर जळगावात उपचार सुरू आहेत. मलकापूर-बुलढाणा रोडवरील दाभाडी येथे डॉ. टेकाळे यांचे घर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी दरोडेखोरांनी प्रवेश केला.
झोपेतच टेकाळे दाम्पत्यावर अचानक हल्ला करून त्यांना मारहाण केली. माधुरी टेकाळे यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने व देवघरातील चांदीच्या मुर्त्या दरोडेखोरांनी पळवून नेल्या. यादरम्यान दरोडेखोरांना टेकाळे दाम्पत्यांनी प्रतिकार केला. त्यामुळे दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत माधुरी या जागीच मृत्युमुखी पडल्या. तर डॉ. गजानन टेकाळे जखमी झाले. त्यांच्या मेंदूला गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मलकापूर येथे उपचार करुन पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आले.
सुदैवाने मुलगी बचावली
डॉ. गजानन टेकाळे दररोज सकाळी गाईचे दूध काढतात. मात्र, रविवारी सकाळचे सहा वाजूनही त्यांना जाग आला नाही. त्यांच्या लहान भावाच्या पत्नीने घरी जाऊन बघितल्यानंतर त्यांना धक्का बसला. डॉ. टेकाळे जखमी तर त्यांची पत्नी माधुरी मृतावस्थेत आढळून आल्या. विशेष म्हणजे, टकाळे दाम्पत्याची दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी सहलीनिमित्त बाहेर गावी गेलेली होती. त्यामुळे ती बचावली आहे.
दरोडेखोरांच्या शोधासाठी तीन पथके
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सारंग नवलकार कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक, हस्त मुद्रा तज्ज्ञ दाभाडी या गावात तळ ठोकून आहेत. जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून, शेजारील जिल्ह्यातील काही गावांनाही अलर्ट करण्यात आले आहे.






