डोंबिवली : कल्याण डोंबिवलीमधील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता डोंबिवलीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्व येथील खंबाळपाडा परिसरात रिक्षा स्टँडवर रिक्षाचा नंबर लावण्यावरून दोन रिक्षा चालकांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुनील राठोड याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या रिक्षा स्टँडवर अश्विन कांबळे आणि सुनील राठोड या दोन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. रिक्षा चालकांनी मध्यस्थी करत दोघांचे भांडण सोडवले. परंतु त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे दोघे पुन्हा डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा येथे असलेल्या रिक्षा स्टँड जवळ उभे होते. या दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद सुरू झाला. संतापलेल्या सुनील राठोड याने लोखंडी रॉडने अश्विन कांबळेवर हल्ला केला. या हल्ल्यात अश्विन याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील राठोड याला पोलिसांनी अटक केली असून टिळकनगर पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
कल्याण डोंबिवलीमधील वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. मागील काही महिन्यांपासून बऱ्याच गुन्हेगारीच्या बातम्या कल्याण डोंबिवलीमधून जास्त येत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोन राजकीय वाद सुद्धा पेटले होते त्यावेळी कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला होता यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले होते तर दुसऱ्या वादामध्ये एकाची फेसबुक लाईव्हवर हत्या करण्यात आली होती.