पाचगणी शहरात भिकारी आणि नशेखोरांचा हैदोस; उभ्या इमारतीचा दरवाजाच दिला पेटवून (Satara News Photo)
वाई : पाचगणी शहरात भिकारी आणि नशेखोरांनी हैदोस माजवला असून, नगरपालिकेच्या समोरच असणाऱ्या मैदानात काही भिकारी व नशेखोरांनी उघड्यावर आपले संसार थाटले आहेत. याकडे मात्र पालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे. मंगळवारी येथील इमारतीचा दरवाजा या लोकांनी जाळून टाकला आहे. या लोकांवर तातडीने कारवाई करावी आणि त्यांना शहराबाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.
हेदेखील वाचा : दिवसभर बसून काम केल्याने होतात गंभीर आजार ; 30 ते 45 वयोगटातील तरुणांमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची समस्या
याबाबत अधिक माहिती अशी की, नगरपालिकेच्या मराठी शाळेला लागूनच असणाऱ्या मोकळ्या जागेत गेल्या दोन वर्षांपासून एक भिकारी जोडपे उघड्यावर आपला संसार थाटून राहत आहे. त्यांनी आता आणखी लोक त्याठिकाणी आणून स्थिरावली आहेत. रात्रीच्या वेळी दारू पिऊन या लोकांचा दंगा वाढला आहे. उघड्यावर चूल पेटवून त्यांचा उदरनिर्वाह चालला असला तरी या ठिकाणी त्यांनी केलेल्या घाणीमुळे या परिसराला दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेजवळ हा प्रकार असून पालिका या लोकांना का पाठीशी घालत आहे? हा सवाल उपस्थित होत आहे.
या लोकांनी एक-एक करत या ठिकाणी चार ते पाच लोकांना येथे स्थायिक केले आहे. दिवसभर दारू पिऊन या लोकांचा दंगा पाहायला मिळत आहे. दिवसभर ते या मैदानात झोपलेले दिसतं आहे. मंगळवारी तर या ठिकाणी असणाऱ्या इमारतीच्या दरवाजाला यातीलच एकाने आग लावली. यामध्ये दरवाजा पूर्णपणे जळून गेला आहे. या अस्वच्छता, दुर्गंधी आणि घाणीमुळे पाचगणीच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत आहे तरी तातडीने या लोकांवर कारवाई करावी व त्यांना पाचगणीतून हाकलून द्यावे, अशी मागणी पाचगणीतील नागरिकांनी केली आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : जयंत पाटलांच्या गुप्त हालचाली; बंद दाराआड चंद्रशेखर बावनकुळेंसोबत एक तास चर्चा