संभाजीनगरमध्ये बनावट कॉलसेंटरचा भांडाफोड; महाराष्ट्र पोलिसांना थेट अमेरिकेतून ई-मेल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : शहरातील बनावट कॉलसेंटर फसवणूक प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. अमेरिकेतून (यूएस) महाराष्ट्र पोलिसांना याप्रकरणात ई-मेल पाठवला असल्याचे निवदेन तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी न्यायालयासमोर दिले. या ई-मेलमध्ये किती लोकांची फसवणूक झाली आहे, याची प्राथमिक माहिती नमूद आहे.
आता लवकरच फसवणूक झालेल्या व्यक्तींची संपूर्ण यादी अमेरिकेतून महाराष्ट्र पोलिसांकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणातील आरोपी अब्दुल फारक मकदुम शहा (वय ४९, रा. खास गेट) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. देशमुख यांनी ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील सुनावणीत अमेरिकेतून आलेल्या ई-मेल आणि त्यातील फसवणूकग्रस्तांची यादी महत्वाची ठरणार आहे. तपास अधिकारी बागवडे यांनी न्यायालयात सांगितले की, हवाल्यामार्फत आलेल्या पैशांतून संपूर्ण कॉलसेंटरचे व्यवस्थापन आरोपी फारुकी करत होता.
कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची, आरोग्याची, तसेच जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची व्यवस्था तो पाहत होता. तसेच कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे हे आरोपी फारुकीचे प्रमुख काम होते. विशेष म्हणजे कॉलसेंटरचा अॅग्रीमेंट देखील आरोपी फारुकीच्या नावे आहे. मुख्य आरोपी जॉन हा सध्या व्हर्च्युअल आयडीद्वारे संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.
रायपूरहून शहरात हलवला सेटअप
आरोपीकडे रोख रक्कम येत होती. मात्र, ती रक्कम कोठून आणि कोणाकडून येत होती, याचा तपास सुरू आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या ऐकत आणखी भर पडली असून, सात चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली असून, १०३ लॅपटॉप आणि १४६ मोबाईल हँडसेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
विविध राज्यांतून अशाप्रकारे फसवणूक
तपासात पुढे उघड झाले की, आरोपी फारुकी याने यापूर्वी विविध राज्यांतही अशाच प्रकारचे बनावट कॉलसेंटर चालवले आहेत. सध्या जप्त केलेला सेटअप सुमारे सात महिन्यांपूर्वी संभाजीनगरात स्थानिक पोलिस पेट्रोलिंग दरम्यान या कॉलसेंटरच्या ठिकाणी शहरात हलवला, असे तपासात समोर आले आहे.






