पुणे विद्यापीठात ३०० कोटींची आर्थिक अनियमितता? अॅड. कौस्तुभ पाटील यांचा गंभीर आरोप
Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे ३०० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप अॅडव्होकेट कौस्तुभ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी यासंदर्भातील काही अधिकृत कागदपत्रे सादर करत ही माहिती समोर आणली.
पाटील यांनी सांगितले की, विद्यापीठातील तृतीय श्रेणीचे स्थावर निरीक्षक विजय ढवळे यांनी कार्यकारी अभियंता (स्थावर) यांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर केली आहेत, जे की नियमांच्या पूर्णपणे विरोधात आहे. ढवळे यांना कार्यकारी अभियंत्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता, मात्र तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्याला प्रथम श्रेणी पदाचा कार्यभार देणे हे विद्यापीठाच्या सेवानियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“अशा प्रकारची नेमणूक कोणाच्या आशीर्वादाने झाली? आणि एवढी मोठी आर्थिक उलाढाल नियमबाह्य पद्धतीने कशी केली गेली याची तपास आवश्यक आहे,” अशी मागणीही अॅड. पाटील यांनी यावेळी केली. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडून या प्रकरणात स्वतंत्र चौकशी व जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-परदेशी यांची ०१/०३/२०२३ रोजी रिअल इस्टेट विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती झाली. सरकारी नियमांनुसार, परदेशी यांच्याकडे पदभार हस्तांतरित झाल्यानंतर ढवळे यांचा अतिरिक्त कार्यभार संपला. परंतु, नियमांकडे दुर्लक्ष करून ढवळे यांनी मार्च २०२५ पर्यंत रिअल इस्टेट विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार सांभाळला.
-अधिकार नसतानाही ढवळे यांनी निविदा प्रसिद्ध केल्या, देयके मंजूर केली आणि पत्रव्यवहार केला. ढवळे दरवर्षी ९० ते ९५ लाख रुपयांची बिले मंजूर करत असत. गेल्या ३ वर्षात अधिकार नसतानाही ढवळे यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची बिले मंजूर केली.
-या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणात महालेखापाल आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करणार असल्याचे ॲड . कौस्तुभ पाटील यांनी सांगितले आहे. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रियल इस्टेट विभागाचे अधिकारी विजय ढवळे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. “जे माझ्यावर आरोप करत आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत.” असे खुले आव्हानही त्यांनी दिले आहे.