मामेभावाला १२ लाखांचा गंडा (संग्रहित फोटो)
वर्धा : आते बहिणीसह तिच्या पतीने नोकरीचे आमिष दाखवून मामेभावासह त्याच्या मित्राला तब्बल 12 लाखांना गंडा घातला. ही घटना बुधवारी (दि.१५) तक्रारीनंतर उघडकीस आली. याप्रकरणी अभिषेक राजेश ब्राह्मणे (रा. महत्मा फुले वॉर्ड) यांच्या तक्रारीवरून अभिषेकची आतेबहीण प्रियंका रामचंद्र पाटील व रामचंद्र पाटील (दोन्ही रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश) या दाम्पत्याविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका ही अभिषेक यांची आतेबहीण आहे. प्रियंकाचे लग्न रामचंद्र याच्याशी ७ वर्षांपूर्वी झाले. लग्नानंतरही तिने तिचा पती हा दिल्ली येथे गृहमंत्रालयात नोकरीवर आहे. शिवाय त्यांची अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे. ते तुला नोकरी लावून देऊ शकतात. पण त्यासाठी ५ लाख रुपये लागतील, असे सांगितले. नातलगच आपल्याला नोकरी लावून देणार असल्याने अभिषेकचा विश्वासही बसला.
हेदेखील वाचा : Pune Fraud : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; लाखो रुपयांना गंडवले
शिवाय त्याने होकारही दिला. त्यानंतर त्याने त्याचा मित्र मयूर गणेश कापटे (रा. दत्तमंदिर वॉर्ड, हिंगणघाट) यालाही नोकरी लावून देण्याची विनंती प्रियंकाकडे केली. मयूर यालाही नोकरीसाठी पैसे द्यावे लागेल, असे सांगण्यात आले. ओळख मंत्रालयातील असल्याने दोघांनाही विश्वास बसला आणि त्यांनी त्यांनी पैशांची जुळवाजुळव करत एकत्रित पैसे केले. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत 12 लाख रुपये दिले. मात्र, नोकरी मिळण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांत गुन्हा दाखल
अभिषेक राजेश ब्राह्मणे आणि त्यांचा मित्र नोकरी मिळेल या आशेने टिकून होते. मात्र, पैसे घेऊनही नोकरी न मिळाल्याने ते निराश झाले. त्यामुळे नंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहेत.