नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक (फोटो- istockphoto)
इचलकरंजी: मुंबईच्या म्हाडा गृहनिर्माण विभागात शासकीय नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी मंत्री व विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव वापरून विश्वास संपादन करत ही फसवणूक केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
शिरोळ तालुक्यातील लाट येथील चैतन्य शिक्षण संस्थेचे दशरथ गणपती काळे आणि शरद गणपती काळे (रा. अब्दुललाट) या दोघां बंधूनी विशाल शांतिनाथ मंडपे व दीपिका विशाल मंडपे (रा. शिरोळ) या पती-पत्नींकडून ही रक्कम उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मंडपे दाम्पत्याने इचलकरंजीच्या अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
फसवणूकीची घटना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी पीडित मंडपे दाम्पत्याने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हाडामध्ये अधिकाऱ्याची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ९ डिसेंबर २०२५ रोजी दशरथ काळे याच्या खात्यात ५ लाख आणि शरद काळे याच्या खात्यात ५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे, तर उर्वरित २३ लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याची माहिती तक्रारीत नमूद केली आहे.
पीडितांनी रकमेबाबत वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळाले नाहीत, उलट दशरथ काळे याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची व खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. आमची पोलीस स्टेशनमध्ये आणि यड्रावकर साहेबांशी ओळख आहे. तुला खोट्या प्रकरणात अडकवेन आणि रात्रीतून मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे मंडपे यांनी म्हटले आहे.
भूत काढण्याच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक
मुंबईतील पार्कसाईट ट्रान्झिट कॅम्पमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून वर्णन केले. त्याच्यावर भूतबाधाच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर मानवी बळी आणि अघोरी प्रथांव्यतिरिक्त काळ्या जादू कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.