सौजन्य फोटो - सोशल मिडीया
छत्रपती संभाजीनगर : मामेबहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून १९ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. गारखेडा परिसरातील साईनगर येथे बुधवारी (१४ ऑक्टोबर) रात्री सुमारे ११ वाजता ही घटना घडली. तौसिफ शमीम शेख (वय १९, रा. साईनगर, गारखेडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आदित्य शेळके याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
तौसिफ हा आई-वडिलांसोबत राहत होता. सेंट्रिंगचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. बुधवारी रात्री सुमारे १० वाजता जेवण झाल्यानंतर तौसिफ आणि त्याचा चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख हे नूर मस्जिदच्या मागील बाजूस बसले होते. त्यावेळी आदित्य शेळके तेथे आला. आदित्यची मामेबहिण तौसिफशी बोलत असल्याच्या कारणावरून त्याने तौसिफशी वाद घातला. वाद वाढू नये म्हणून मुजम्मील यांनी तौसिफला घरी जाण्यास सांगितले. यावेळी आदित्यने तौसिफला सोडणार नसल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
काही वेळाने मुजम्मील आपल्या घरासमोर आले. त्यावेळी तौसिफ मोटारसायकलवर बसून मोबाईल पाहत होता. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आदित्य पुन्हा तेथे आला. त्याने हातातील चाकूने तौसिफच्या छातीत अचानक वार केला. हल्ल्यामुळे तौसिफ खाली कोसळला. त्यानंतर आदित्यने त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावरही चाकूने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तौसिफवर हल्ला झाल्याचे लक्षात येताच मुजम्मील आणि इतर नागरिक त्याच्याकडे धावले. मात्र, तोपर्यंत आदित्य घटनास्थळावरून पसार झाला होता. गंभीर जखमी झालेल्या तौसिफला नातेवाइकांनी तातडीने मोटारसायकलवरून एमजीएम रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. तौसिफच्या छातीसह नाक आणि डोक्यावरही जखमा झाल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. या प्रकरणी तौसिफचा चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख यांच्या फिर्यादीवरून आदित्य शेळके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि घटनेमागील इतर बाबींचा तपास पोलिस करत आहेत.
Ans: आरोपीची मामेबहिण तौसिफशी बोलत असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Ans: १९ वर्षीय तौसिफ शमीम शेख.
Ans: नाही. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.






