धक्कादायक ! पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर; महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्...
शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे कौटुंबिक कारणातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करत तिचा खून करण्यात आला. इतकेच नाहीतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. ही खळबळजनक घटना तळेगाव ढमढेरे येथे घडली. सविता मनोहर कांबळे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, मनोहर नागोराव कांबळे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस हवालदार अमोल चव्हाण, पोलीस शिपाई मच्छिंद्र निचित, नागेश वाघमारे हे पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर हजर असताना अचानक एक इसम पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याने मी माझ्या बायकोचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलीस गोंधळून गेले. पोलीस शिपाई मच्छिंद्र निश्चित व नागेश वाघमारे यांनी सदर इसमाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या तळेगाव ढमढेरे येथील घरी घेऊन पाहणी करण्यासाठी गेले असता घराला बाहेरुन कडी होती. तेव्हा पोलिसांनी कडी उघडून आतमध्ये पाहणी केली असता सदर इसमाची पत्नी सविता कांबळे घरात आतमध्ये घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
शेजारीच लोखंडी हातोडी पडल्याचे पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने सविता कांबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सविता मनोहर कांबळे (वय ३८, सध्या रा. आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. शिरसो श्रीराम नगर ता. मूर्तिजापूर जि. अकोला) या महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
हेदेखील वाचा : Uttar Pradesh Crime: विश्वासाचं भयावह रूप! मैत्रिणीने नशेची औषध दिलं, नंतर बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ काढून…
दरम्यान, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार चंद्रकांत काळे, प्रतीक जगताप यांसह आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला असून, घडलेल्या प्रकाराबाबत राजेश मनोहर कांबळे (वय १९ वर्षे सध्या रा. आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. शिरसो श्रीराम नगर ता. मूर्तिजापूर जि. अकोला) याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी मनोहर नागोराव कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.






