(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘सन मराठी’वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. मालिकेत सतत नवे ट्विस्ट येत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.काही दिवसांपूर्वी मंजूला सत्या निर्दोष असल्याचं कळतं. मात्र तिच्याकडे त्याचे ठोस पुरावे नसतात. सत्या आणि मंजूचं नातं पुन्हा सुरळीत झाल्यानंतर मम्मीसाहेब त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा कोणताही डाव यशस्वी होत नाही.
दरम्यान, नव्या प्रोमोमध्ये एक धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. मंजू एका वृद्ध व्यक्तीला धडकते आणि माफी मागते. पण ही व्यक्ती साधी नसून सत्या-मंजूच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठी आलेली असल्याचे संकेत मिळतात. यापूर्वी व्हॅलेंटाईन डे दिवशीही एका अनोळखी व्यक्तीने मंजूला फुलं पाठवून प्रेम व्यक्त केलं होतं.मंजूला मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
या दोघांच्या आयुष्यात येणारा हा तिसरा व्यक्ती नक्की आहे तरी कोण? यामध्ये मम्मी साहेबांचा हात असेल का? तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने सत्या मंजू वेगळे होऊ शकतील का? मंजूच्या जीवाला धोका असेल का? या सर्व प्रश्नांची उत्तर पुढील भागात पाहणं रंजक ठरणार आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांनी कमेंट करत म्हंटल आहे की, ” कितीही झाले आणि कोणीही आले तरी मंजू सत्याचीच आहे. विषय संपला.” तर एका प्रेक्षकांनी म्हंटलय, ” साताऱ्याच्या वाघिणीची शिकार करणे एवढं सोप्पे नाही.सत्या मंजू लवकरच एकत्र येतील.” यांसारख्या कमेंट करत प्रेक्षकांनी सत्या- मंजूच्या जोडीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. आता पुढील भागात नेमकं काय घडणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.






