पूजा बागुल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; पतीने मांत्रिकाला हाताशी धरून...
धुळे : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या कपिल बागुल याने प्रेयसीसाठी पत्नी पूजा उर्फ शारदा हिला विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती. मात्र, या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून, पत्नीचा खून करण्यापूर्वी पतीने एका मांत्रिकाला हाताशी धरून त्याला पत्नीवर करणी करण्याची सुपारी दिली होती. यासाठी दीड लाख रुपये देखील दिले होते, असे उघडकीस आले आहे.
धुळे शहरातील वलवाडी परिसरात सदर खुनाची घटना एक जूनला घडली होती. सैन्य दलातील कपिल बागुल याच्या महाविद्यालयीन मैत्रिणीसोबत असलेल्या संबंधाची माहिती पत्नी पूजा हिला समजली होती. यातून पत्नी पूजा उर्फ शारदा हिला पेस्टिसाईड इंजेक्शन देत जीवे मारले होते. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून, पत्नीची हत्या करण्यापूर्वी पतीसह सासरच्या मंडळींनी मांत्रिकाला सुपारी दिली होती.
दोन वेळेस फसला होता हत्येचा प्रयत्न
लष्करात नोकरीला असलेल्या कपिल बागुल याने पत्नी पूजा हिचा खून करण्यासाठी कथित मांत्रिक भूषण काळे याला सुपारी दिली होती. शिवाय त्यासाठी कपिल, त्याची आई विजया व प्रज्ञा यांनी सुमारे दीड लाख रुपये दिले होते. मात्र, दोन वेळा करणीचा डाव फसल्यामुळे मांत्रिक भूषणकडे पैशांची मागणी होऊ लागली. त्यामुळे भूषणने सचिन जाधव, जयेश जगताप व दोन अल्पवयीन मुलांना हाताशी घेऊन खुनाचा कट रचला.
मांत्रिकासह अन्य एका जणाला कोठडी
दरम्यान, मांत्रिकाने पेस्टिसाईड, इंजेक्शन, सलाईन आणले होते. पूजाच्या घरी जाऊन तिला इंजेक्शनने पेस्टिसाईड दिले. हे संपूर्ण खून प्रकरण पश्चिम-देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तुषार देवरे, उपनिरीक्षक साईनाथ तळेकर व पथकाने उघडकीस आणले होते. आता खून प्रकरणातील कथित मांत्रिकासह अन्य एकाची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.