सायबर चोरट्यांनी आता लढवली 'ही' नवी शक्कल; APK फाईल पाठवतात अन् एक क्लिक करताच... ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी अनेक आयडिया योजतात. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी एक नवा आणि धोकादायक सापळा रचला आहे. मित्र-नातेवाईकांकडून सोशल मीडियावर येणाऱ्या डिजिटल निमंत्रणांचा फायदा घेत ‘Come to wedding with family’ असा मेसेज मोबाईलवर पाठवला जात आहे. पाठवलेली APK फाईलवर क्लिक करताच फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.
Wedding Invitation Card नावाने एक साधी दिसणारी एपीके फाईल जोडलेली असते, जी खरी लग्नपत्रिका असल्याचा भास होतो. नागरिकांनी ही फाईल लग्नपत्रिका समजून डाऊनलोड करताच काही सेकंदांतच त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ऍक्सेस हॅकर्सच्या हाती जातो. सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, ही एपीके फाईल प्रत्यक्षात एक ‘मालवेअर’ (हॅकिंग सॉफ्टवेअर) आहे. एकदा डाऊनलोड झाल्यावर ते मोबाईलमध्ये आपोआप इन्स्टॉल होते आणि तुमच्या प्रत्येक हालचालीचा, ओटीपीचा व अॅपच्या वापराचा डेटा हॅकर्सना पाठवते. या सायबर हल्ल्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मोबाईलचा ऍक्सेस मिळताच हॅकर्स बँकिंग अॅप्स, खासगी फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट्स, ओटीपी मिळवतात. त्यानंतर बँक खाती रिकामी करण्याचे प्रकार घडत असून, काही प्रकरणांमध्ये नागरिकांच्या संवेदनशील माहितीचा गैरवापर केल्याचेही समोर आले आहे.
नागरिकांनी सावध राहावे
‘लग्नपत्रिका हॅकिंग’ प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने सायबर विभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अनोळखी लिंक किंवा फाईल्स कोणत्याही परिस्थितीत डाऊनलोड करू नका. संशयास्पद फाईल त्वरित डिलीट करा. जर अशा प्रकारची फसवणूक तुमच्यासोबत घडली असेल, तर तत्काळ राष्ट्रीय हेल्पलाइन १९३० या क्रमांकावर संपर्क साधा. ऑनलाईन तक्रार www.cyber-crime.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तक्रार नोंदवा. वेळेत कारवाई केल्यास होणारा संभाव्य आर्थिक तोटा टाळता येऊ शकतो.
हेदेखील वाचा : वाढता सायबर फ्रॉड थांबवण्यासाठी टेलिकॉम विभाग लागू करणार नवे नियम! या कंपन्यांना करावे लागणार मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन
सायबर फ्रॉड रोखण्याचे एक आव्हान
देशात सायबर फ्रॉडच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. वेगवेगळ्या जाहिराती, सायबर फ्रॉडबाबत जनजागृती अशा विविध माध्यमातून लोकांना सावध करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता या सायबर फ्रॉडना आळा घालण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने एक नवा नियम जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम सर्व मोठे टेलिकॉम ऑपरेटर्स जसे की एअरटेल रिलायन्स जिओ बीएसएनएल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांना लागू होणार आहे.






