संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रेमसंबंधांच्या वादातून एका तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि. १२) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे लगत घडली आहे.
या प्रकरणी किरण बाळासाहेब केदारी (वय ३३, ताजे, मळवली, मावळ, पुणे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत संतोष केदारी आणि नितीन ज्ञानदेव केदारी (दोघेही ताजे, पोस्ट मळवली, मावळ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा भाऊ विकास बाळासाहेब केदारी ( वय ३१, ताजे) याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मानेवर पिस्तूलसारख्या हत्याराने गोळी मारून गंभीर जखमी केले आहे. फिर्यादीला संशय आहे की, विकासचे आरोपी अभिजित याच्या बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या कारणामुळे आरोपींनी हा हल्ला केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणावर तिच्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्री भैरवनाथ मंदिर, पिंपळे निलख येथे घडली आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर त्रंबक चोरघडे (३१, बाणेर बालेवाडी फाटा, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बलभीम शिंदे (वय५२, पिंपळे निलख), एक अल्पवयीन मुलगा आणि एका अनोळखी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलभीम शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर रात्री त्यांच्या मैत्रिणीला भेटायला आले असता, हे तिच्या मुलाने पाहिले. त्यानंतर तो मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन ज्ञानेश्वर यांना मारहाण करण्यासाठी बाणेर येथील त्यांच्या घरी गेला. अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि अनोळखी तरुणाने मिळून ज्ञानेश्वर यांना लाथा, बुक्क्यांनी तसेच धारदार शस्त्राने डोक्यात, पाठीवर आणि हातावर वार करून जखमी केले. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.






