संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणावर तिच्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्री भैरवनाथ मंदिर, पिंपळे निलख येथे घडली आहे.
या प्रकरणी ज्ञानेश्वर त्रंबक चोरघडे (३१, बाणेर बालेवाडी फाटा, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बलभीम शिंदे (वय५२, पिंपळे निलख), एक अल्पवयीन मुलगा आणि एका अनोळखी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलभीम शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर रात्री त्यांच्या मैत्रिणीला भेटायला आले असता, हे तिच्या मुलाने पाहिले. त्यानंतर तो मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन ज्ञानेश्वर यांना मारहाण करण्यासाठी बाणेर येथील त्यांच्या घरी गेला. अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि अनोळखी तरुणाने मिळून ज्ञानेश्वर यांना लाथा, बुक्क्यांनी तसेच धारदार शस्त्राने डोक्यात, पाठीवर आणि हातावर वार करून जखमी केले. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला
पिंपरी शहरातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात गेल्या काही दिवसाखाली धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून एका १८ वर्षीय तरुणीवर चॉपरने वार करून तिला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यात मुलीचा प्रियकरही आहे. ही घटना हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात तरुणीच्या हाताला, तोंडाला आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या असून, तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले आहे. हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करत आहेत. पोलिसांनी प्राथमिक तपासात हल्ल्याचे कारण ‘प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद’ असल्याचे स्पष्ट केले आहे.






