संग्रहित फोटो
पुणे : मुंढव्यात फ्रेशर पार्टीसाठी आलेल्या तरुणांना रस्त्यात मद्यपान करताना हटकल्यानंतर तरुणांनी आधी ज्येष्ठाशी वाद घातला अन् नंतर जमलेल्या स्थानिक रहिवाशांशी वाद घालत गोंधळ घातला. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. हे प्रकरण मोठ्या गोंधळाच्या वळणावर असताना शेवटी पोलिसांनी येथे दाखल होत हा गोंधळ नियत्रंणात आणला. रविवारी रात्री हा राडा झाला. दरम्यान, स्थानिकांनी ‘पब’ बंदसाठी आता आंदोलन छेडले असून, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या गौरी पिंगळे यांनी दिली. दुसरीकडे पुर्वपरवानगी न घेता फ्रेशर पार्टी आयोजित केल्याप्रकरणी संबंधित हॉटेलविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
शुल्क विभागाला बोलवत ती पार्टी बंद
याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात हॉटेल व्यवस्थापन तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २८५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माहितीनुसार, मुंढव्यात पीओ कार्टन या हॉटेलात एका नामांकित महाविद्यालयातील ८०० ते १००० मुलांची ‘फ्रेशर ४.०’ पार्टी आयोजित केली होती. ही फ्रेशर पार्टी विनापरवाना केली होती. दरम्यान, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही माहिती मुंढवा पोलिसांना मिळाली. त्यांनी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला पार्टीबाबत विचारणा केली. त्यांना परवानगी घ्यावी असे सांगितले. तशी नोटीस देखील बजावली होती. मात्र, हॉटेल व्यवस्थापनाने त्याची परवानगी घेतलीच नाही. त्यांनी पार्टी तशीच सुरू केली. तेव्हा पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला बोलवत ती पार्टी बंद केली. तसेच, त्यावर कारवाई केली आणि पोलिस तेथून गेले.
नेमकं घडलं काय..!
पोलिसांची परवानगी न घेतल्यानंतर पार्टी बंद केल्यानंतर मुल रस्त्यावर आली. त्यांनी रस्त्यावर बिअरच्या बॉटेल्समधून दारू पिण्यास सुरूवात केली, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तेव्हा एका ज्येष्ठाने या मुलांना हटकले. त्यातून वादाला सुरूवात झाली. नंतर स्थानिक मोठ्या प्रमाणात जमले. तेव्हा मुलांमध्ये व स्थानिकांमध्ये तुफान राडा झाला. हे सुरू असतानाच हॉटेल व्यवस्थापन या मुलांच्या बाजूने आले. त्यांनीही स्थानिकांशी वाद घातला. हा वाद मोठ्या प्रमाणात पेटला. तेव्हा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. नंतर मुंढवा पोलिसांनी येथे धाव घेत हा वाद नियत्रंणात आणला.
पिंगळे वस्ती हा रहिवासी परिसर आहे. पासपोर्ट ऑफिस शेजारीच टेरेसवर पब आहे. येथे पार्टीसाठी मुले आली होती. ही मुले रोडवर दारू पित असताना एका ज्येष्ठ नागरिकाने दारू पिणाऱ्या मुलांना हटकल्यानंतर त्यांनी त्या ज्येष्ठ नागरिकावर बिअरची बाटली फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्थानिक नागिरकांनी जमा होत त्या मुलांना जाब विचारला. त्यावरून मुलांनी वाद घालत स्थानिकांशी भांडण केले. पबच्या मालकाने दादागिरी केली. तेव्हा नागरिक आक्रमक झाले होते. हा पब बंद करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
– गौरी पिंगळे, सामाजिक कार्यकर्त्या.