संग्रहित फोटो
पुणे : स्मार्ट सायबर चोरट्यांकडून सातत्याने नागरिकांना वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत फसवले जात असून, दोन दिवसात शहरातील ११ नागरिकांची एक कोटी ६४ लाखांना फसवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शेअरच्या बहाण्याने २८ लाखांची फसवणूक
खराडीमधील व्यक्तीला शेअरमधील गुंतवणूकीवर चांगला नफा मिळेल असे सांगत त्यांना शेअर्स विकत घ्यायला लावून २८ लाख २० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदारांना चोरट्यांनी एक लिंक पाठवून ग्रुपमध्ये ऍड केले व गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून शेअर विकत घ्यायला लावले. पोलीस निरीक्षक (गुन्हे) रेजीतवाड तपास करत आहेत.
बाणेरमधील ५५ वर्षीय व्यक्तीची फसवणूक
फेसबूकवर स्टॉक तसेच आयपीओ मिळवून देण्याची जाहिरात देऊन बाणेरमधील ५५ वर्षीय व्यक्तीची २७ लाख ६५ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. सायबर चोरटयांनी शेअर मार्केच्या आमिषाने वारजेतील २४ वर्षीय तरुणाची १७ लाख ४१ हजार १५० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
शेअर खरेदीचे आमिष
ब्लॉक डीलमधील शेअर खरेदीचे आमिष दाखवत सायबर चोरट्याने ५१ वर्षीय व्यक्तीची १६ लाख ५० हजार १२० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच जबरदस्तीने शेअर विकत घ्यायला लावून चंदननगर येथील ३५ वर्षीय तरुणाची १३ लाख ४० हजार ६४५ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तर अशाच प्रकारे कर्वेनगर येथील महिलेची १३ लाख १४ हजार ७५८ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय महिलेने अलंकार पोलिसांत तक्रार दिली आहे.
बॉक्स
तरुणीची ११ लाखांची फसवणूक
मनी लॉन्डरिंगची केसमध्ये तुमचे नाव असल्याचे सांगत कारवाईची भिती दाखवून २६ वर्षीय तरुणीची ११ लाख ६० हजार १३२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाणेर येथील तरुणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, सायबर चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. तसेच टास्कच्या आमिषाने कोथरूड येथील २१ वर्षीय तरुणाची ७ लाख ५२ हजार ४६९ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. कर्ज क्लोज करण्यात येईल असे सांगून आंबेगाव येथील ४६ वर्षीय व्यक्तीची ५ लाख २५ हजार ४८६ रुपयांची फसवणूक केली आहे.
बॉक्स
लाईट बंद करण्याचे आमिषाने फसवणूक
लाईट कट होईल अशी भिती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला ७ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञातावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बोपोडी परिसरात राहायला आहेत. गौरव जोशी असे नावाच्या चोरट्याने त्यांना फोन केला. लाईट बील भरले नाही, त्यामुळे लाईट कट होईल असे सांगितले. महावितरणमधून अधिकारी बोलत असल्याची त्याने बतावणी केली. त्यानंतर तक्रारदारांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲपमध्ये बँक खात्याची माहिती भरल्यानंतर खात्याच्या गोपनीय माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून सात लाख ६३ हजार रुपये चोरले. पोलीस निरीक्षक चोरमले तपास करत आहेत.