संग्रहित फोटो
पुणे : नोकरी सोडल्यानंतर कामगारानेच मालकाला ७० लाखांची खंडणी मागत त्यांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकने खंडणीखोर नोकराला बेड्या ठोकल्या आहेत. नितीन देवलाल सरोज (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सुरज बागमार यांनी खडक पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, अमंलदार शुभम देसाई, निलेश साबळे, विठ्ठल साळुंखे यांच्या पथकाने कामगिरी केली.
नितीन बागमार यांच्याकडे पूर्वीला नोकरी करत होता. नोकरी सोडल्यानंतर त्याने बागमार यांना खंडणी मागण्याची योजना आखली होती. त्यासाठी आरोपी नितीनने बागमार यांना फोन करून पैशाची मागणी केली. व पैसे न दिल्यास तक्रारदाराला व परिवाराला मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या बागमार यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली. युनिट एकच्या पथकाला तक्रार दिली. नंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. तेव्हा तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपीची ओळख पटली. आरोपी हा सोमवार पेठेत एका ठिकाणी काम करत होता. त्यावेळी पोलीस अमंलदार नितीन देसाई यांना मिळालेल्या माहितीवरून सोमवार पेठेतून युनिट एकच्या पथकाने नितीन सरोजला अटक केली.
माढ्यात अपहरण करुन खंडणीची मागणी
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पडसाळी (ता. माढा) येथील शेतकऱ्याला बळजबरीने गाडीवर बसून अपहरण करीत ३ लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर मोहन फरड (रा. पडसाळी, ता. माढा) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी रवी भोसले, अक्षय पवार, कृष्णा शिंदे, सतीश भोसले, दीपाली शिंदे, अविधा भोसले (सर्व रा. बारलोणी, ता. माढा) यांच्यासह इतर दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता भुताष्टे पाटीजवळ लऊळ शिवारातील हॉटेल यशराजमध्ये फिर्यादी ज्ञानेश्वर फरड व पुतण्या समाधान फरड जेवणासाठी गेले होते. यावेळी जेवणाची ऑर्डर देऊन जेवण चालू असताना हॉटेलवर संशयित आले. त्यानी फिर्यादीच्या पुतण्याला बाहेर बोलावून घेऊन गेले. काय घडले याची पाहणी करण्यासाठी फिर्यादीही त्यांच्या मागे गेले. नंबर नसलेल्या दोन दुचाकींपैकी एका गाडीवर बळजबरीने बसवून समाधानला कुडूवाडीला घेऊन जाताना फिर्यादीला यामध्ये तुम्ही पडू नका, असाही दम दिला. त्यानंतर फिर्यादीने दुसरा पुतण्या सिद्धेश्वर फरड याला फोन करून घटना सांगितली. त्यानुसार त्याने फिर्यादीतील व्यक्तींची ओळख सांगू शकतो, असे सांगितले. दरम्यान समाधान वेळोवेळी सिद्धेश्वरला ३ लाख रुपये फोनवर मागत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.