 
        
        छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचे जाळे उघड (Photo Credit - AI)
छत्रपती संभाजीनगर: ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘कमी काळात पैसा’ यांसारख्या विविध फसवणुकीच्या प्रकारांनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस कॉल सेंटरचे एक मोठे आंतरराष्ट्रीय जाळे उघडकीस आले आहे. अमेरिकेसह इतर देशांतील नागरिकांना गंडवणाऱ्या या टोळीकडे आढळलेल्या सायबर डेटावरून, देशाची आंतरिक सुरक्षा धोक्यात असल्याचा गंभीर खुलासा तपासात झाला आहे. या सेंटर चालकाकडे भारताशी संबंधित महत्त्वाचा संवेदनशील डेटाही असल्याचे उघड झाले आहे.
प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी स्वतः या आरोपीची कसून चौकशी केली आहे. पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या या बोगस कॉल सेंटर सिंडिकेटच्या कारवायांमुळे देशाच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकन नागरिकांना टॅक्स चोरी किंवा लोन फ्रॉडची भीती दाखवून, कायदेशीर कारवाईचा धाक दाखवत, त्यांच्याकडून गिफ्ट कार्डच्या माध्यमातून हजारो डॉलर्स उकळले जात होते. विशेष म्हणजे, ही टोळी VPN, डार्कनेट (Darknet) आणि बिटकॉइनचा वापर करून तपास यंत्रणांनाही चकमा देत होती.
या रॅकेटचा मास्टरमाईंड अब्दुल फारुख मुकदम शाह उर्फ फारुकी याला पोलिसांनी गोव्याहून अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या कॉल सेंटरचे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरले होते. अमेरिकेतील नागरिकांकडून उकळलेले गिफ्ट कार्ड कोड्स अमेरिकेतील ‘जॉन’ नावाच्या व्हर्च्युअल व्यक्तीकडे पाठवले जात असत. तेथे कोड रिडीम करून डॉलरची रक्कम क्रिप्टोकरन्सी (बिटकॉइन) मध्ये रूपांतरित केली जाई आणि नंतर ती रक्कम रुपयांमध्ये भारतात आणली जात असे. यामुळे मनी-ट्रेल (पैशांचा माग) शोधणे तपास यंत्रणांसाठी खूप अवघड बनले होते.
डार्कनेट, क्रिप्टो, व्हीपीएन नवे आव्हान: या प्रकरणात व्हीपीएन (VPN) आणि डार्कनेटचा गैरवापर करून फसवणूक करण्यात आली. ‘तुटानीटा’ (Tutanota) या एन्क्रिप्टेड ईमेल सेवेद्वारे बनावट कायदेशीर नोटिसा पाठवून लोकांना जाळ्यात ओढले गेले. यामुळे भारतीय सायबर सुरक्षा व्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीला तोंड देण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या घटनेमुळे हे स्पष्ट झाले आहे की, डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून भारतातूनही परदेशी नागरिकांना लक्ष्य करणारे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा घटनांमुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा धोक्यात येते, तसेच सायबर सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय डेटा संरक्षणाची गरज अधोरेखित होते. सायबर पोलीस, गुप्तचर संस्था आणि आर्थिक गुन्हे तपास विभाग यांनी एकत्र येऊन अशा गुन्हेगारी नेटवर्कविरुद्ध ठोस कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या रॅकेटसाठी फारुकीने उत्तर-पूर्व भारतातील १०० हून अधिक तरुण-तरुणींना कामावर ठेवले होते. अमेरिकेतील एफबीआयने (FBI) महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला असून, फसवणुकीचे बळी ठरलेल्या लोकांची यादी लवकरच मिळणार आहे. फारुकीने शहरातील मोहा नाका, सिंधी कॉलनी, गारखेडा, कामगार चौक यांसारख्या भागांमध्ये चार इमारती भाड्याने घेतल्या होत्या. कामगारांना बाहेर पडण्यास बंदी होती आणि त्यांना रात्री आलिशान वाहनांमधून कॉल सेंटरवर नेले जाई आणि सकाळी परत सोडले जाई. विशेष म्हणजे, तेथील जागा मालकांसोबतचे भाडेकरारनामेदेखील फारुकीच्याच नावाने आहेत, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या गुप्त कार्यपद्धतीमुळे शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरील तरुण राहत असल्याचा पत्ता स्थानिक पोलिसांनाही लागला नव्हता.






