‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ; कल्याणमध्ये खळबळ
kalyan Crime: कल्याण पश्चिमेतील (kalyan Crime) सर्वोदय सृष्टी इमारतीत राहणाऱ्या सलमा जहीर खान यांनी आपल्या पतीसह काही व्यक्तींविरोधात मानसिक त्रास, पाठलाग आणि छेडछाडीचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, आपल्यासह मुलांच्या सुरक्षिततेबाबत भीती व्यक्त केली आहे. या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सलमा खान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पतीने दुसऱ्या महिलेसोबत विवाह केला असून संबंधित महिला त्यांच्या शेजारीच राहते. या कौटुंबिक वादानंतर आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप सलमा यांनी केला आहे. संबंधित महिलेच्या वडिलांकडून आपला पाठलाग केला जात असल्याचा आणि विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या परिस्थितीमुळे आपण आणि आपली मुले सुरक्षित नसल्याची भीती वाटत असल्याचे सलमा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
परिस्थितीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकदा स्वतःला मुलांसह घरात लॉक करून राहावे लागत असल्याचा दावा सलमा खान यांनी केला आहे. आपल्याला किंवा आपल्या मुलांना काही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागू नये, यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सध्या राहत असलेले घर सोडून जावे यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचाही आरोप सलमा यांनी केला आहे. पतीने ज्या तरुणीसोबत दुसरे लग्न केले आहे, तिला त्या घरात राहता यावे, या उद्देशाने आपल्याला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
या संपूर्ण प्रकरणाबाबत सलमा खान यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी प्राथमिक स्वरूपाची नोंद केल्याचे सलमा यांनी सांगितले. आपल्याला आणि मुलांना धोका असल्याने पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक व्यक्ती परदेशी नागरिक असल्याचा दावाही सलमा खान यांनी केला आहे. संबंधित व्यक्तीकडे भारतातील मतदार ओळखपत्रासह अन्य भारतीय कागदपत्रे कशी आली, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र संबंधित व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबत किंवा कागदपत्रांबाबत अधिकृत यंत्रणेकडून अद्याप कोणतीही पुष्टी समोर आलेली नाही.
या प्रकरणात महिलेने केलेले मानसिक छळ, पाठलाग, छेडछाड, घर सोडण्यासाठी दबाव तसेच नागरिकत्व आणि कागदपत्रांसंदर्भातील दावे हे आरोपांच्या स्वरूपात आहेत. संबंधित व्यक्तींची बाजू आणि पोलिसांकडील तपासाची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची सत्यता पोलिसांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आपल्या आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सलमा खान यांनी केली आहे.
KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश






