बाप नाही हैवान! पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलले (Photo Credit- X)
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास सुहास जाधव हे आपल्या मालकीच्या शेतात गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली मुले शिवांश जाधव आणि श्रेया जाधव (दोघेही वय ८) यांना शेतातील विहिरीजवळ नेऊन त्यांना विहिरीत ढकलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विहिरीत पडल्यानंतर दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर सुहास जाधव हे घटनास्थळावरून फरार झाले होते.
दरम्यान, काही वेळाने मुलांचा शोध घेत असताना ही घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत शोधमोहीम राबवून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी सुहास जाधव याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले. काही तासांच्या शोधमोहीमनंतर बार्शी परिसरातून सुहास जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, सुहास जाधव यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव अथवा अन्य कारणांमुळे ही घटना घडली का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. नातेवाईकांचे जबाब नोंदविणे, गावातील नागरिकांकडून माहिती घेणे तसेच इतर पूरक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे हिंगणी गावासह करमाळा तालुक्यात शोककळा पसरली असून, लहानग्या मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गावात भीती आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.






