लातूर: लातूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. प्रेम संबंधात अढथळा ठरत असल्याने हा कट रचण्यात आला होता. ही घटना लातुरातील म्हाडा कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणी तक्रार दाखल केली असून तक्रारदाराचे नाव दीपक दत्तू खेडे (वय ३७, रा. संत गोरोबा सोसायटी, विवेकानंद चौक, लातूर) असे आहे. दिपकने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश सूर्यवंशी (वय २२, रा. वलांडी, ता. देवणी, जि. लातूर) याचे सचिन सूर्यवंशी यांची पत्नी भक्ती हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे प्रेमात अडथळा ठरत आल्यामुळे अविनाशने त्याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार शुक्रवारी रात्री म्हाडा कॉलनीतील कमानीनजीक बाभळगाव रोड परिसरात अविनाशने धारदार चाकूने सचिनच्या तोंडावर आणि छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात सचिन महादेव सूर्यवंशी (वय २४, रा. म्हाडा कॉलनी, लातूर) गंभीर जखमी झाला. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी अविनाश नंदकिशोर सूर्यवंशी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक रेडेकर करत आहेत.
पतीकडून छळ…
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी सचिन हा मजुरीचा काम करतो. सचिन महादेव सूर्यवंशी (वय ४०, मुळ रा. देवर्जन, ता. उदगीर) पत्नी भक्ती (वय ३०) आणि दहा महिन्यांच्या मुलीसह महिनाभरापूर्वीच लातूरच्या म्हाडा कॉलनीत राहायला आला होता. मात्र, भक्तीचे तिच्या नात्यातील अविनाश किशोर सूर्यवंशी (वय २१, रा. वलांडी, ता. देवणी) याच्यासोबत गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. भक्ती आणि अविनाश हे दोघे सतत भेटायचे. ही बाब सचिनच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यात वारंवार वाद होत होते. तो कामानिमित्त बाहेर जाताना पत्नीला घरात बंद करून जात होता. त्यामुळे वैतागलेल्या भक्तीने अविनाशला ‘पती छळ करतो’ असं कारण सांगून त्याला हल्ला करण्यास प्रवृत्त केले.
मुंबईतून गावाकडे आला आणि…
अविनाश हा बीफार्मसीचं शिक्षण मुंबईत घेत होता. काही दिवसांपासून भक्तीला भेटण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी त्याने आई-वडिलांना “पोटदुखीचा त्रास होत आहे” असा बहाणा सांगितला. त्यावर पालकांनी “गावाकडे ये, डॉक्टरांना दाखवू” असं सांगितल्याने तो गावाकडे, वलांडी येथे परतला. तिथे तो तब्बल पाच-सहा दिवस मुक्कामी थांबला. यानंतर त्याने आपल्या तीन मित्रांना लातूरपर्यंत दुचाकीवर सोडण्यासाठी सांगितलं. या प्रवासादरम्यानच त्याने म्हाडा कॉलनीत हल्ला केला आणि पुन्हा रात्री वलांडीला परतला.
दरम्यान, रात्री सुमारे १० वाजता विवेकानंद चौक पोलिसांना फोन आला की, एक व्यक्ती रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीची ओळख पटवली आणि त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ती सतत अडखळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पुढील तपासात तिने अखेर आरोपी अविनाश सूर्यवंशीचे नाव कबूल केले.
भक्तीचे आणि सचिनचे हे दुसरे लग्न
दोन्ही आरोपी नात्यातीलच असून त्यांच्यात सुमारे सहा वर्षांपासून संबंध होते. अविनाश बीफार्मसीचे शिक्षण घेत असून तो भक्तीपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी लहान आहे. भक्तीचे पहिले लग्न झाले होते, परंतु काही दिवसांतच ते मोडले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तिचे दुसरे लग्न देवर्जन येथील सचिन महादेव सूर्यवंशी (वय ४०) यांच्याशी झाले. सचिनची पहिली पत्नी निधन पावली होती आणि त्याला एका मुलीचा जन्म झाला होता. सध्या ती मुलगी केवळ १० महिन्यांची आहे.