Crime News Live Updates
11 Sep 2025 03:13 PM (IST)
सप्टेंबर महिना म्हणजे सणांचा जल्लोष, गणपती बाप्पाच्या गजरात भरलेलं वातावरण आणि आनंदाच्या उधळणीचा काळ. या सणासुदीच्या वातावरणात अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्या प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. या महिन्यात प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी प्रेक्षकांना मराठी चित्रपटांसोबतच हिंदी आणि साऊथ ब्लॉकबस्टर सुपरहिट चित्रपट मराठीत अनुभवायला मिळणार आहेत. यामध्ये खास आकर्षण ठरणार आहे नुकताच थिएटरमध्ये हाऊसफुल्ल ठरलेला आणि प्रेक्षकांची दाद मिळवणारा बेटर-हाफ ची लव्हस्टोरी.
11 Sep 2025 03:08 PM (IST)
सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत हे कार्यभार पाहणार आहेत. आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
11 Sep 2025 03:00 PM (IST)
बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. आता त्याच व्यक्तीच्या तीन वर्षाच्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. बीड जवळील इमामपूर रोड परिसरात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वीच याच चिमुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. जयराम बोराडे असे चिमुकलीच्या मृत वडिलाचे नाव आहे. या घटनेने बीडमध्ये आता खळबळ उडाली आहे.
11 Sep 2025 02:40 PM (IST)
बारामतीमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. माझ्या जागेत बाथरूम का बांधले म्हणून विचारायला जाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. बाप लेकाने आपल्या पुतण्याला बेदम मारहाण केली. यात पुतण्याचा जीव गेला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे पुतण्याला मारहाण केल्यानंतर हे दोघे बाप- लेक तालुका पोलीस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद दिली. ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या बाप लेकाला अटक केली आहे.
11 Sep 2025 02:20 PM (IST)
तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेचे हात-पाय बांधण्यात आले आणि तिला प्रेशर कुकरने मारहाण करण्यात आली. तिच्या डोक्यावर कुकरने हल्ला केल्यानंतर तिचा चाकूने गळा कापण्यात आला. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर कात्रीने जखमा करण्यात आल्या. या क्रूरतेनेनंतर हल्लेखोरांनी घरातील सर्व मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या. विशेष म्हणजे पळून जाण्यापूर्वी आरोपींनी घराच्या बाथरूममध्ये आंघोळ केली. त्यांचे रक्ताने माखलेले कपडे बाथरूममध्ये सोडून परफ्यूम लावले आणि नंतर पळून गेले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
11 Sep 2025 02:00 PM (IST)
मित्र-मैत्रिणीने स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडुन चोरी केली होती. चार दिवसापूर्वी कोरोची (ता. हातकणंगले) येथील विवेकानंदनगरमध्ये भरदिवसा झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व बुलेट असा 4 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
11 Sep 2025 01:50 PM (IST)
जुन्नरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात डीजे आणि ढोल पथकाचा आयोजन देखील करण्यात आलं होत. यात डीजे वाहन उतारावरती असतानाच डीजे वाहन ढोल-ताशा पथकातील युवकांच्या अंगावर आले. यात ६ जण गंभीर जखमी झाले आहे तर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उपचारादरम्यान आदित्य काळे (वय 21) याचा मृत्यू झाला.
11 Sep 2025 01:35 PM (IST)
बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. परळी- बीड राष्ट्रीय महामार्गावर हायवा ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत सरपंच आणि त्याच्या नातीचा मृत्यू झाला आहे. तर सरपंचाच्या पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ते आपल्या नातीला दवाखान्यात दाखवायला परळी गेले होते. तेथून परळीकडून गावाकडे जात असताना ही दुर्घटना घडली. अपघातात मृतक सरपंचाचे नाव वसंत चव्हाण आणि नातीच नाव श्रुती चव्हाण असे आहे.तर जखमी पत्नीचा नाव कस्तुराबाई चव्हाण असे आहे.
11 Sep 2025 01:25 PM (IST)
सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपले आहे. बुधवारी पहाटे दमदार पाऊस झाला. मध्यरात्री 2 ते पहाटे 5.30 पर्यंत पाऊस सुरू होता. या अडीच तासांच्या काळात तब्बल 37.4 मिलिमीटर पाऊस बरसल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली. दाटीवाटी असलेल्या लोकवस्तीत पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली.सोलापूर शहरातील महत्त्वाचे रस्ते पावसामुळे खचले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतेवेळी त्यांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यात फिरावे लागले.
11 Sep 2025 01:10 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार नेमका कोणी केला याची माहिती पोलिसांनी अद्याप उघड केलेली नाही आहे. काल बुधवारी बार्शी येथील कला केंद्रातील एका नर्तिकामुळे एका उपसरपंचां आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता माढ्यातील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
11 Sep 2025 01:00 PM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईप एकाच्या डोक्यात मारला आहे. पाईप डोक्यात मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. निखिल नितीन घाडगे (वय 25 रा. साईनाथनगर भोनेमाळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आशादुल्ला हारुण जमादार (वय 27 रा. अशोक सायझिंगमागे) याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमादार याला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असतानाही तो शहरात वावरत होता.
11 Sep 2025 12:40 PM (IST)
शनिवार पेठेत कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या ८० वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात ही घटना रात्री घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ४५ वर्षीय मुलाला आईचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. अविनाश पांडुरंग साप्ते (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुसुम साप्ते (वय ८०) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अविनाश साप्ते यांचा भाचा आशिष अशोक समेळ (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
11 Sep 2025 12:20 PM (IST)
गुन्हेगारी विश्वात पाळला जाणारा एक अलिखीत नियम असतो. वैर-वैरातच ठेवायचे. कुटूंबिय, नातेवाईक, मित्र यांना स्पर्श करायचा नाही, अन् त्यांच्याकडे वाकड्या नजरेनेही पहायचे नाही. सरकारी कायद्याप्रमाणेच हा नियम प्रत्येक टोळी पाळते. मात्र, आंदेकर व गायकवाड टोळीच्या युद्धाने हा नियम मोडला आहे. गेल्या वर्षभरापासून दोन टोळ्यांच्या संघर्षाने कुटुंबियांना टार्गेट करण्याचा नवा ट्रेंड सुरू करून ‘गुन्हेगारीतला नो-फॅमिली रूल’ बाद ठरवला आहे. याच नियमभंगातून गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या दोन जणांचा बळी गेला. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ तर उडाली आहेच पण, हा नियमभंग आता आणखी किती जणांचा अशा पद्धतीने जीव घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
11 Sep 2025 11:55 AM (IST)
हडपसरमधील जेएसपीएम कॉलेज परिसरात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका १९ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळी न थांबता तसेच त्याची माहिती न देता पसार झाला आहे. अभिजीत गणेश रेवले (वय १९, रा. फुरसुंगी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याचे भाऊजी कचन कराळे (वय ४२) यांनी तक्रार दाखल केली आहे.
11 Sep 2025 11:34 AM (IST)
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत वाहनसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. औद्योगिक वाढ, शैक्षणिक व रोजगार केंद्रांचे विस्तार आणि नागरिकांचा खासगी वाहनांकडे वाढता कल या सर्व घटकांमुळे ग्रामीण रस्त्यांवर वाहनांचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वाढत्या वाहनताणाचा थेट परिणाम वाहतुकीच्या सुरळीततेवर तर होतच आहे, पण अपघातांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असल्याचे आकडेवारी स्पष्ट करते. २०२५ या एकाच वर्षात ग्रामीण भागात ८६० हून अधिक अपघात नोंदवले गेले. यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असून, अपघातांमध्ये ३०% वाढ झाल्याचेही नोंदवले गेले आहे.
नागपूरमध्ये एका व्यापाऱ्याला दरोडेखोरांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. यावेळी हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि 50 लाख रुपये लुटले. या घटनेत व्यापारी जखमी झाला आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडबी चौकात एका व्यापाऱ्यावर भररस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला व त्याच्याजवळील जवळपास 50 लाखांची रक्कम लुटून पळ काढला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या गोळीबारात व्यापारी जखमी झाला आहे.