संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुलगी झाली म्हणून पत्नीला सातत्याने मारहाण करत असताना पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वडगाव मावळ न्यायालयातील सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निकाल दिला आहे.
योगेश कैलास जाधव (वय ३३, रा. चंदनवाडी, चांदखेड, मावळ) असे शिक्षा सुनावलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. चांगुणा योगेश जाधव यांचा खून झाला होता. याबाबत चांगुणा यांचे वडील शिवाजी दामू ठाकूर (वय ४५, रा. परंदवाडी, मावळ) यांनी तक्रार दिली होती.
योगेश हा पत्नी चांगुणा यांच्याशी मुलगी झाली म्हणून नेहमी वाद घालत होता. त्यांना मारहाण करत होता. २८ ऑगस्ट २०२१ ला अशाच वादामध्ये त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला होता. या खटल्याचे कामकाज सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांनी पाहिले. ॲड. चौगुले यांनी या खटल्यामध्ये परिस्थितीजन्य व वैद्यकीय पुरावे अन्वये आठ साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर केले. तसेच गुन्हा खटला शाबीत करण्यासाठी प्रभावीपणे युक्तिवाद केला.
युक्तिवादात त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. सरकार पक्षाचे साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून योगेश याला न्यायालयाने सश्रम जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैयालाल थोरात आणि शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल पाटील, तत्कालीन तपास अधिकारी उपनिरीक्षक संदीप गाडिलकर यांच्या मार्गदर्शनानुसार कोर्ट पोलिस अंमलदार अविनाश हरी गोरे व पोलिस शिपाई शिल्पा माळी यांनी सदर खटल्यामध्ये न्यायालयामध्ये पाठपुरावा केला.
पोटच्या मुलानेच आईवर केले चाकूने सपासप वार
शनिवार पेठेत कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या ८० वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ४५ वर्षीय मुलाला आईचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. अविनाश पांडुरंग साप्ते (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुसुम साप्ते (वय ८०) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अविनाश साप्ते यांचा भाचा आशिष अशोक समेळ (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.