सौजन्य - नवराष्ट्र टीम
इचलकरंजी : मित्र-मैत्रिणीने स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडुन चोरी केली होती. चार दिवसापूर्वी कोरोची (ता. हातकणंगले) येथील विवेकानंदनगरमध्ये भरदिवसा झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व बुलेट असा 4 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सिध्दांत श्रीकांत सगरे (वय 24, रा. धुळेश्वरनगर कबनुर) आणि त्याची मैत्रीण दिया सचिन गायकवाड (वय 20 रा. इंदिरानगर कोरोची) अशी त्यांची नावे आहेत. कोरोचीतील विवेकानंद परिसरात भारती सजन ढाले या कुटुंबासह राहण्यास आहेत. 7 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ ते दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी 48 हजाराची सोन्याची 10 ग्रॅमची चेन, 4 हजार 800 रुपयांचे कानातील सोन्याचे टॉप्स, 4 हजार 800 रुपयांच्या कानातील सोन्याच्या रिंगा, 1 लाखाचा सोन्याचा नेकलेस, 50 हजाराची सोन्याची बोरमाळ, 35 हजाराची मोहनमाळ, 20 हजाराची एक सोन्याची बाळ चेन, 20 हजाराची सोन्याची अंगठी, 1 हजाराची एक बाळ अंगठी, 2 हजाराचे चांदीचे ब्रासलेट, 1 हजाराचा चांदीचा कडदोरा असा 2 लाख 86 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
या घरफोडीचा तपास सुरु असताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार शहापुरातील तुळजाभवानी मंदिर परिसरात दुचाकीवरून फिरणार्या सिध्दांत सगरे आणि दिया गायकवाड या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने मिळुन आले. त्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दोघांना पोलिस ठाण्यात आणून पोलिस खाक्या दाखवताच दोघांनी कोरोचीतील घरफोडीची कबुली दिली. सगरे व गायकवाड हे दोघे मित्र-मैत्रिण असून स्वत:च्या लग्न खर्चासाठी त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 4 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शहापूरच्या पोलीस पथकाने केली आहे.
दोन दिवसांत तब्बल 25 वाहनांची चोरी
पुणे शहरातील घरफोड्या, सोनसाखळी चोरट्यासोबतच वाहनचोर देखील सुसाट सुटले आहेत. अवघ्या दोन दिवसांत शहरातून तब्बल २५ वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, मध्यवर्ती भाग असलेल्या खडक, फरासखाना परिसरासह येरवडा, चंदननगर, आंबेगाव, वाघोली, लोणी काळभोर येथून या वाहनाची चोरी झाली आहे. सार्वजनिक रस्ते असो वा खासगी ठिकाणे अश्या सर्वच ठिकाणी वाहनचोर सक्रिय असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत.