सौजन्य - नवराष्ट्र टीम
टेंभुर्णी : टेंभुर्णी जवळील वेणगाव येथे मंगळवारी (दि.९) मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसर हादरला आहे. वेणगाव चौकातील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्राच्या मागील गेटबाहेर झालेल्या भांडणातून ही घटना घडली आहे. या गोळीबारात वाखरी (ता. पंढरपूर) येथील देवा बाळु कोठावळे (वय २७, व्यवसाय लॉज) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डाव्या मांडीवर गोळी लागली आहे. त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.
फिर्यादी कोठावळे याच्या जबाबानुसार, त्याचा मित्र ज्ञानेश्वर बंदपट्टे आणि आरोपी सुरज पवार (रा. पंढरपूर) यांच्यात बैठक लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि सुरज पवार व त्याच्या तीन साथीदारांनी बंदपट्टेवर हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी कोठावळे तसेच वैभव ननवरे आणि सचिन सांळुखे यांनी हस्तक्षेप केल्यावर पवारच्या सोबत असलेल्या एकाने रिव्हॉल्व्हरमधून सरळ गोळी झाडली. ही गोळी कोठावळे याच्या मांडीवर लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. ही घटना समजताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पाहणी करून तातडीने जखमींना दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यासाठी मदत केली तसेच या घटनेनंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुरज पवार आणि त्याचे तीन साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, हेडकॉन्स्टेबल संदीप गिरमकर, हेडकॉन्स्टेबल विलास नलवडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मोहन तळेकर यांना शोधमोहीमेसाठी रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास कुलदीप सोनटक्के करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात वाहनचोर मोकाटच, नागरिक त्रस्त; दोन दिवसांत तब्बल 25 वाहनांची चोरी
घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीमकडून तपास करून घटनास्थळावरून रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे. लवकरच फरार झालेल्या आरोपींना गजाआड करून गोळीबाराचे कारण शोधून काढले जाईल, असे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा : स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा चोरी, बंटी- बबली पोलीसांच्या जाळ्यात