कोणत्याही ऑफरपासून दूर राहा, रशियन सैन्यात भरती होऊ नका; MEA चा भारतीय तरुणांना कडक इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना रशियन सैन्यात सामील होण्याच्या कोणत्याही ऑफरपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
काही भारतीयांना बांधकाम कामाच्या बहाण्याने रशियाला नेऊन युद्धभूमीत पाठवल्याचे आरोप.
भारताने मॉस्कोसमोर हा मुद्दा उपस्थित करून नागरिकांची सुटका करण्याची मागणी केली.
Indian youth recruitment Russia : “कोणत्याही ऑफरपासून दूर राहा” असा स्पष्ट आणि कठोर इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आपल्या नागरिकांना दिला आहे. रशियन सैन्यात भारतीय नागरिकांना फसवणुकीने भरती केल्याच्या बातम्या समोर आल्याने भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रातून धक्कादायक माहिती समोर आली. पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशात दोन भारतीय युवक आढळले, जे बांधकामाच्या कामासाठी रशियाला गेले होते, परंतु त्यांना थेट युद्ध आघाडीवर तैनात करण्यात आले. या खुलाशामुळे केवळ संबंधित कुटुंबांमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “भारत सरकारने गेल्या एका वर्षभरात अशा भरतींशी संबंधित धोक्यांबाबत वारंवार इशारा दिला आहे. आम्हाला अलीकडेच पुन्हा असे वृत्त मिळाले की काही भारतीय नागरिक रशियन सैन्यात सामील झाले आहेत. आम्ही दिल्ली व मॉस्को येथील रशियन अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा उचलून धरला आहे आणि आमच्या नागरिकांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे.” जयस्वाल यांनी पुढे सांगितले की, “भारतीय नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भरतीच्या ऑफरपासून दूर राहावे. अशा पावलांमध्ये गंभीर धोके दडलेले आहेत. मंत्रालय बाधित नागरिकांच्या कुटुंबांशी सतत संपर्कात आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : KP Sharma Oli : भारतासमोर नतमस्तक न झाल्यामुळे सत्तेला मुकलो; राम जन्मभूमीबाबतही ‘ओली’ यांचे धक्कादायक वक्तव्य
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये रशियाने ताब्यात घेतलेल्या सेलिडोव्ह शहरातून फोनवर बोलताना त्या दोन भारतीयांनी धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्रात नोकरीचे आश्वासन देऊन त्यांना रशियात आणण्यात आले. परंतु प्रत्यक्षात त्यांना जबरदस्तीने युद्धभूमीत पाठवण्यात आले. या दोघांच्या मते, आणखी किमान १३ भारतीय अशाच परिस्थितीत अडकलेले आहेत. हे युवक मागील सहा महिन्यांत विद्यार्थी किंवा अभ्यागत व्हिसावर रशियात गेले होते. त्यांना एका एजंटने आकर्षक पगाराचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांच्यावर फसवणूक करून रणांगणात तैनात करण्यात आले.
Our response to media queries on Indians recruited into the Russian army
🔗 https://t.co/i6WIbHOK51 pic.twitter.com/xzQKGEfJgR— Randhir Jaiswal (@MEAIndia) September 11, 2025
credit : social media
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याआधी अनेकदा आपल्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले होते. परंतु या नव्या प्रकरणानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे स्पष्ट दिसते. भारताने रशियाला थेट सांगितले आहे की, अशा भरती तातडीने थांबवाव्यात आणि आमच्या नागरिकांना सुरक्षितपणे सोडण्यात यावे. या घटनांमुळे भारतीय युवकांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे परदेशात नोकरी किंवा करिअरच्या शोधात निघताना अनेकदा फसव्या एजंटांच्या जाळ्यात अडकण्याचा धोका किती गंभीर आहे? युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीयांच्या कथा या धोक्याचे वास्तव दाखवतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Unrest : India-Nepal सीमा सील, मैत्री बस सेवा बंद; भारताने घेतला कठोर निर्णय
फसवणूक झालेल्या युवकांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत आहेत. आपल्या प्रियजनांचे सुरक्षित परतणे हाच त्यांचा एकमेव ध्यास झाला आहे. मंत्रालयानेही आश्वासन दिले आहे की बाधित सर्व भारतीय नागरिकांची ओळख पटवून त्यांची सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रशिया-युक्रेन युद्धात वाढत जाणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना फसवणूक करून भरती करण्याचा मुद्दा चिंताजनक ठरत आहे. MEA चा इशारा हा केवळ एक सूचना नाही, तर जीवितहानी टाळण्यासाठी दिलेला तातडीचा इशारा आहे. कोणत्याही आकर्षक ऑफरमागे प्राणघातक धोके दडलेले असू शकतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.