Crime News Updates
शिर्डीमध्ये दहीहंडीच्या दिवशी आनंदाचा माहोल असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून दोन तरुणांनी सानूकुमार ठाकूर (रा. शिर्डी) या 21 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करत आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत निर्घृण हत्या केली. या घटनेने शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 16 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. साई कुमावत आणि शुभम गायकवाड अशी या दोन आरोपींची नावे असून, दोघेही शिर्डीतील रहिवासी आहेत. घटनेनंतर काही तासांतच शिर्डी पोलिसांनी दोघांना तात्काळ अटक करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
17 Aug 2025 05:00 PM (IST)
पुण्यात अमली पदार्थांची आवक सुरूच असून, तस्कारांकडून सातत्याने अमली पदार्थांसाठा पुण्यात आणून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांकडून काही तस्कारांना पकडण्यात यश येत असले तरी यामधून पुण्यातील ड्रग्जची तस्करी सुरूच असल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोन व गुन्हे शाखेच्या युनिट सहाने वाघोलीत मोठी कारवाई केली आहे. तब्बल ७६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त केले आहे. येथून ३५१ ग्रॅम ५०२ मिलीग्रॅम एमडी हा ड्रग्ज जप्त केला आहे. रामेश्वरलाल मोतीजी आहिर (४५) आणि नक्षत्र हेमराज अहिर (२५, दोघेही (रा. अहिल मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, चित्तोडगड, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलिस निरीखक वाहीद पठाण, पोलिस अमंलदार कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने केली आहे. दोन्ही तस्कर राजस्थान येथून आले असल्याचे समोर आले आहे.
17 Aug 2025 04:30 PM (IST)
लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक १३ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भालचंद्र लक्ष्मण साळुंखे (रा. गोडोली, सातारा) यांना विनाकारण लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच जनार्दन मोरे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.
17 Aug 2025 04:05 PM (IST)
सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक ११ रोजी सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास धीरज मारुती वाडकर (रा. कृष्णानगर, सातारा) हा युवक राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत. दुसऱ्या घटनेत, दि. १४ रोजी सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी २४ वर्षीय विवाहिता राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत. तिसऱ्या घटनेत, दिनांक १२ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी राजेंद्र सोपान सोनमळे (रा. म्हसवे, ता. सातारा) हे राहत्या घरातून निघून गेले आहेत. अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.
17 Aug 2025 03:40 PM (IST)
विसावा नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी २५ हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ ते १४ दरम्यान विनायक प्रकाश कांबळे (रा. दत्तात्रय अपार्टमेंट, विसावा नाका, सातारा) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार अवघडे करीत आहेत.
17 Aug 2025 03:15 PM (IST)
कात्रजमधील आंबेगाव परिसरातून बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे. शुभम राजेंद्र बेलदरे (वय २९, रा. दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव), मयूर ज्ञानोबा मोहोळ (वय २३, रा. नऱ्हे रस्ता, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे आणि रहीम शेख हे कात्रज भागात गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण थांबले असून, त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती भोकरे आणि शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. दोघांनी पिस्तूल का बाळगले, तसेच त्यांनी कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
17 Aug 2025 03:01 PM (IST)
लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भालचंद्र लक्ष्मण साळुंखे रा. गोडोली, सातारा यांना विनाकारण लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच जनार्दन मोरे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.
17 Aug 2025 02:40 PM (IST)
संभाजीनगर, सातारा येथील चंदनाच्या झाडाची अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ रोजी रात्री दहा ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान प्रकाश ज्ञानंद शेळके रा. संभाजीनगर, सातारा यांचे घराच्या रस्त्याच्या कडेला असलेले चंदनाचे झाड अज्ञात चोरट्याने कशाने तरी कापून चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
17 Aug 2025 02:20 PM (IST)
दुचाकी वर चक्कर आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ रोजी प्रवीण बळीराम सावंत रा. गोडोली, सातारा यांना दुचाकी वर असताना सातारा नगरपरिषद येथे चक्कर आल्याने मोटरसायकल वरून पडून ते बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.
17 Aug 2025 02:00 PM (IST)
टेकरी येथील दहावीत शिकणारे १३ जण फुटबॉल मॅच झाल्यावर उमा नदीत पोहायला गेले होते. मात्र नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोन जण नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे. मृतकाचे नाव आयुष गोपाले (१६) आणि जीत वाकळे (१७) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही अल्पवयीन सिंदेवाही शहरातील रहिवासी असून घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
17 Aug 2025 01:40 PM (IST)
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात एक हादरवणारी घटना समोर आली आहे. राहाता तालुक्यात शिर्डीपासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केलवड-को-हाळे शिवारात विहिरीत पाच मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणात वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याचा संशय आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
17 Aug 2025 01:30 PM (IST)
त्र्यंबकेश्वरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्र्यंबकेश्वर मंदिरात दुपारी मुख्य प्रवेशद्वारासमोरील हा धक्कदायक प्रकार घडला. मंदिर संस्थानाने मुख्य दर्शन अचानक बंद केल्याने भावनिक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली होती. याचं रूपांतर वादात झाले आणि यातूनच मारहाणीचा प्रकार घडला आहे. या व्हिडिओमध्ये सुरक्षारक्षक भाविकाला मारहाण करतांना दिसत आहे.
17 Aug 2025 01:15 PM (IST)
उत्तर प्रदेशमधील मेरठमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची त्याच्या मुलीच्या वाढदिवसादिवशीच हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या अब्दुल असे आहे. त्याच्या मुलीचा १५ ऑगस्ट रोजी मृत व्यक्तीच्या मुलीचा १४ वा वाढदिवस होता. या खास दिनी अब्दूलने घरी पार्टी आयोजित केली होती. त्याने भाड्याने DJ लावला होता. रात्री ११ वाजता अब्दूल डीजेवर वाढदिवसाची गाणी वाजवत होता. त्यामुळे राडा झाला. ही घटना घडली.
17 Aug 2025 12:50 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेला डॉ. प्रांजल खेवलकर आणखी अडचणीत सापडला आहे. संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संमती न घेता व्हिडिओ आणि फोटो काढले, असा आरोप एका महिलेने तक्रारीत खेवलकरवर केला आहे. या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
17 Aug 2025 12:30 PM (IST)
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. कौशल्या पप्पू कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे महिलेचे नाव आहे. या प्रकणी कौशल्या यांचा मुलगा कृष्णा (वय ३०) याला अटक केली आहे. याबाबत कृष्णाचा मोठा भाऊ बाबासाहेब (वय ३६) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
17 Aug 2025 12:05 PM (IST)
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, तिरंग्यांची पताका आणि देशभक्तीची गाणी सुरू असतानाच निगडी प्राधिकरणात दुर्दैवी घटना घडली आहे. बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात आणि त्यांच्या कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवार (दि. १५) रोजी दुपारी सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ६५ समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली आहे. मृतांमध्ये दत्ता होलारे, लखन धावरे (दोघे रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) यांचा समावेश आहे.
17 Aug 2025 11:44 AM (IST)
पुण्यातील लोहगाव भागातून एक घटना समोर आली आहे लोहगाव भागात वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.