चक्क गृहराज्यमंत्र्यांचाच मोबाईल चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल (फोटो- सोशल मिडिया)
बीड : संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्याती आली होती. यावरून संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता गृहराज्यमंत्री योगेश कदम हे बीड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल गायब झाल्याचा प्रकार घडला. खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्या बाबतीत अशी घटना घडल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीत माध्यमांचे कॅमेरे उपस्थित असताना त्यांचा मोबाईल अचानक गायब झाला. योगेश कदम यांचा मोबाईल गायब झाल्याचे वृत्त समजताच सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी याला दुजोरा दिला. राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांचा मोबाईल सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची हमी कशी मिळणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
दरम्यान, या दौऱ्यावेळी कॅमेऱ्यासमोरच मोबाईल गायब झाला. त्यामुळे बीड प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, मोबाईल चोरीला गेला की हरवला याचा शोध पोलिस घेत आहेत. ही घटना सोशल मीडियावर चांगचीच चर्चेत आली आहे. या प्रकरणाचा लवकर छडा लावावा, अशी मागणी शिवसेनेकडून केली आहे. तसेच बीडमधील विरोधकांनी सरकारला सुरक्षेच्या मुद्यावरून धारेवर धरले आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. असे असताना आता गृहराज्यमंत्र्यांचाच मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनीही याप्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.