पत्नीने बाईकवरून जाताना मुद्दाम स्पीड ब्रेकरवर चप्पल खाली टाकले अन् घात झाला, बियरच्या बाटलीने पतीला ३६ वेळा भोसकलं
मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. २५ वर्षांच्या राहुल ऊर्फ गोल्डन याचा त्याच्या १७ वर्षीय पत्नीने आणि तिच्या प्रियकराच्या दोन मित्रांनी मिळून हत्या केली आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे मृत राहुलला फूटलेल्या बियरच्या बाटलीने ३६ वेळा भोसकण्यात आलं होतं. तसंच खून केल्यानंतर पत्नीने तिच्या प्रियकराला व्हिडिओ कॉल करून काम तमाम केल्याचं सांगितलं. या घटनेनंतर सर्व जण फरार झाले होते. दरम्यान पोलिसांनी या सर्वांना अटक केली असून तपास सुरू आहे.
भरत ऊर्फ युवराज (वय २०), रा. कोद्री शाहपूर, बुरहानपूर, ललित (वय २०), रा. कोद्री शाहपूर, बुरहानपूर, मृत राहुलची अल्पवयीन पत्नी, एक अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
बुरहानपूरचे पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी इंदूर-इच्छापूर रस्त्यालगत आयटीआय कॉलेजच्या समोर झुडपांमध्ये एक मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्वरित तपास सुरू केला. मृत व्यक्ती राहुल ऊर्फ गोल्डन असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत प्रकरणाचा झडा लावला.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, राहुलची पत्नी या घटनेनंतर पसार झाली होती आणि तिचे युवराज नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. युवराजला अटक केल्यानंतर त्याने राहुलच्या पत्नीबरोबर मिळून खूनाचा कट रचल्याची कबुली दिली. १२ एप्रिल रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेदरम्यान, राहुलच्या पत्नीने युवराजला व्हिडिओ कॉल करून रक्ताने माखलेल्या राहुलचा मृतदेह दाखवला आणि काम तमाम केल्याचं सांगितलं. त्यानंतर ती, एक अल्पवयीन मित्र आणि ललित नावाचा तरुण उज्जैन किंवा मुंबईच्या दिशेने फरार झाले
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संव्हेर येथून ती पत्नी, अल्पवयीन मित्र व ललित यांना ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने युवराज व त्याच्या मित्रांना खूनाच्या कटाची आधीच माहिती दिली होती. खूनाच्या दिवशी, ती राहुलला खरेदीच्या निमित्ताने बाहेर घेऊन गेली. बाजारातून परतताना त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्यावेळी ललित आणि अल्पवयीन मित्र जुन्या आरटीओ बॅरियरपासून त्यांचा पाठलाग करत होते. आयटीआय कॉलेजजवळील स्पीड ब्रेकरवर तिने मुद्दाम चप्पल खाली पाडली आणि राहुलला थांबायला लावले. गाडी थांबताच, ललित व अल्पवयीन मित्र मोटरसायकलवर आले आणि राहुलला झुडपांमध्ये खेचून नेत त्याच्यावर हल्ला केला.
तिने सर्वप्रथम बीयरच्या बाटलीने राहुलच्या डोक्यात वार केला, त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीने दुसऱ्या बाटलीने वार केला आणि धारदार शस्त्राने ३६ वेळा भोसकलं. ललितनेही त्याच्यावर वार करून त्याचा जागीच खून केला. गुन्हा केल्यानंतर ते तिघे रावेर रेल्वे स्थानकावर गेले आणि तिथून इतारसीमार्गे उज्जैनकडे रवाना झाले. गुन्हा घडत असताना सर्व आरोपी मोबाईलवर एकमेकांशी संपर्कात होते. त्यामुळे पोलिसांना त्यांची माहिती मिळत गेली आणि त्यांना ताब्यात घेतलं.