शाळेत मराठी भाषेचं प्रत्येकाला व्याकरण शिकवलेलं असतं. त्या व्याकरणाच्या संबंधित क्रियापदं आजही चुकतात. ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक आज आपण समजून घेऊयात. खूपदा असं होतं की, “मी पुस्तक शोधत होते आणि खुप वेळाने मला ते भेटलं”, असं वाक्य सहज म्हटलं जातं. पुस्तकंच असं नाही कुठलीही वस्तू खुप वेळाने शोधल्यावर सापडली की, नकळत सवयीप्रमाणे म्हटलं जातं ते म्हणजे ‘भेटलं’. पण तुम्हाला माहितेय का ? हे वस्तूंसाठी भेटणं हे क्रियापद अत्यंत चुकीचं आहे. खरं सांगायचं तर वस्तू मिळतात किंवा सापडतात. एखाद्या निर्जीव वस्तू किंवा एखादी संधी जेव्हा आपल्याला चालून येते तेव्हा ती मिळते. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालंच तर, “मला कामाच्या ठिकाणी नवी संधी मिळाली”. “मी कित्येक दिवस शोधत असलेलं पुस्तक मला सापडलं” किंवा ‘मिळालं’. आता हे झालं मिळणं या क्रियापदाविषयी.
आता भेटणं हे क्रियापद वापरतात तरी कधी तर हे ही आता जाणून घेऊयात. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलते, संवाद साधते आपण तिच्याशी गप्पा मारतो तेव्हा ते झालं ‘भेटणं’. म्हणजेच काय तर, “मला खूप दिवसांनी माझी जवळची मैत्रीण भेटली”. ” खूप दिवसांनी माझ्या जुन्या मित्राशी माझी भेट झाली”. एकंदरीतच सांगायचं झालं तर ‘माणसं भेटतात’ आणि’ वस्तू मिळतात’ किंवा सापडतात. तर अशी आहे ही मराठी भाषेची गंमत.
खरं सांगायचं तर, मराठी भाषा ही मैला-मैलांवर बदलते. बोलण्याची तिची लकब बदलते, त्यामुळे प्रमाण भाषा शुद्ध आणि गावची भाषा अशुद्ध असं होत नाही. मराठी भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नाही पण ती चुकीच्या पद्धतीने बोलण्यात येण्याने योग्य क्रियापदांच्या अर्थाचा अनर्थ होतो. म्हणूनच जर तुमचा सुद्धा भेटणं आणि मिळणं यात गल्लत होत असेल तर आजपासून चुकीचं न बोलता योग्य मराठी बोलण्याचा सराव करुयात. भाषा योग्य बोलली तर ती जगते आणि तेव्हाच ती वाढते.
जय महाराष्ट्र!






