सावरी ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट! पुन्हा घटनास्थळी अतिरिक्त मुद्देमाल जप्त..., जावळी तालुक्यात नक्की काय सुरु?
राहिलेला मुद्देमाल गोळा करण्यासाठी पीआय बोधे यांनी परिसरातील प्रत्येक कानाकोपरा तपासला. या तपासादरम्यान ४० लिटर लिक्विड केमिकल भरलेला एक कॅन आणि दोन मोठ्या पिशव्या पोलिसांच्या हाती लागल्या. विशेष म्हणजे, यापूर्वी ११५ कोटींचा मुद्देमाल जप्त करून गेलेले पोलीस पाच दिवसांनंतर पुन्हा घटनास्थळी येतात आणि इतका मोठा केमिकल कॅन व बंद पिशव्या पोलीस व्हॅनमध्ये टाकून घेऊन जातात. यामुळे संशय अधिकच बळावला आहे.
या कारवाईत एमडी ड्रग्स निर्मितीत प्रत्यक्ष सहभागी असलेले तीन बंगाली मजूरांचा सहभाग आहे. नजर अब्बास सय्यद उर्फ सद्दाम, राजीकुल रहमान (वय ३०) आणि हाजीबुल इस्लाम (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, या संपूर्ण ड्रग्स रॅकेटचा मूळ सूत्रधार म्हणून स्थानिक युवक ओंकार ढगे याचे नाव तपासात पुढे आले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार असल्याने पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान,धक्कादायक बाब म्हणजे छाप्यानंतर पाचव्या दिवशी वरिष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीनंतर पीआय बोधे (पुणे) हे वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा सावरीतील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एमडी ड्रग्स फॅक्टरीच्या अगदी शेजारी असलेल्या शौचालयाच्या पाठीमागे लपवून ठेवलेला ४० लिटरचा लिक्विड केमिकलचा कॅन आणि दोन मोठ्या बंद पिशव्या जप्त केल्या. हा मुद्देमाल तातडीने पोलीस व्हॅनमधून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी रवाना करण्यात आला.
मात्र, यानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या केमिकलचा वापर नेमका एमडी ड्रग्स निर्मितीसाठी होत होता का? त्या बंद पिशव्यांमध्ये आणखी ड्रग्स किंवा कच्चा माल होता का? की काही महत्त्वाचे पुरावे मुद्दाम लपवून ठेवण्यात आले होते? या प्रश्नांची ठोस उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या पाच दिवसांत सातारा पोलीस, स्थानिक पोलीस आणि विविध तपास पथकांनी अनेकदा घटनास्थळी भेटी दिल्या होत्या. तरीही शौचालयाच्या पाठीमागे किंवा अन्य ठिकाणी लपवलेला हा मुद्देमाल कोणाच्याही लक्षात कसा आला नाही? हा प्रश्न संशय अधिकच गडद करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतूनच “आणखी काही मुद्देमाल लपवलेला आहे” अशी माहिती समोर आली असावी. त्यानंतरच वरिष्ठांच्या आदेशावरून पुन्हा तपास पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आणि पाच दिवसांनंतर ही अतिरिक्त जप्ती करण्यात आली.
या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, सुषमाताई अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचे थेट नाव घेत गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दाव्यांमुळे तपास अधिक संवेदनशील झाला आहे.
दरम्यान, आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारवाईच्या दिवशी ओंकार ढगे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत बसवले होते का? तो संशयित आरोपी नंतर सोडून देण्यात आला का? आणि जर तसे असेल, तर तोच आरोपी आज फरार कसा? पाच दिवसांनी झालेली ही कारवाई, नव्याने सापडलेला केमिकल साठा आणि फरार सूत्रधार, या सगळ्यामुळे सावरी एमडी ड्रग्स प्रकरण अजूनही पूर्णपणे न सुटलेलं कोडं बनलं आहे.






