दगडाने ठेचून गुंडाची हत्या(संग्रहित फोेटो)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच तुरुंगातून सुटल्यानंतर वस्तीत पुन्हा वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुंडाची 7 ते 8 जणांनी मिळून निर्घृण हत्या केली. शस्त्रांनी सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर दगडाने डोके ठेचून त्याला ठार मारले. ही थरारक घटना सदर ठाण्यांतर्गत गोंडवाना चौकात घडली.
अजय गाते (वय 31, रा. बैरामजी टाऊन, गोंडवाना चौक) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तीन आरोपींना अटक केली आहे. अखिलेश कंगाली (वय 24, रा. बैरामजी टाऊन), अनुप ऊर्फ करण कनोजिया (वय 20, रा. कपिलनगर) आणि मुकेश ऊर्फ अमन उईके (वय 19, रा. राजनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. इतर आरोपी करण यादव, अमन यादव, ऋतिक पिल्ले आणि शिवम गेडाम हे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
हेदेखील वाचा : Punjab Crime : भय अजून संपेना! निळ्या ड्रमनंतर आता पोत्यात सापडला मृतदेह , कुजलेले आंबे असल्याचे सांगत रस्त्यावर फेकले
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर दुहेरी हत्याकांडासह अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करण्यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. वर्षभरापूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. गोंडवाना चौकाजवळील खदान वस्तीत त्याचे घर आहे. मात्र, तो प्रेयसीसोबत दुसरीकडे राहात होता. खदान वस्तीत त्याचे नेहमीच येणे-जाणे होते.
तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय
तुरुंगातून सुटल्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला होता. खदान परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी तो नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देत होता. वस्तीत त्याची दहशत होती. लहान मुलांकडून तो कामे करून घ्यायचा. भीतीपोटी त्याचा कोणी विरोध करत नव्हते. ज्याने ऐकले नाही, त्या मुलांना तो मारायचा. विनाकारण लोकांशी वाद घालत होता. यामुळे सर्वजण त्याच्यापासून त्रस्त होते.
मुलांना त्रास देणं सुरुच
घटनेच्या रात्रीसुद्धा तो वस्तीत आला होता. नेहमीप्रमाणे त्याने मुलांना त्रास दिला. काही मुले आरोपी अखिलेशकडे रडत गेली. त्यावेळी अजयने मारहाण केल्याचे सांगितले. या प्रकारामुळे अखिलेश संतापला आणि त्याने अजयला धडा शिकवण्याची योजना बनवली. रात्री एक वाजताच्या सुमारास अजय चौकात बसला होता. त्यावेळी या टोळक्याने मिळून त्याची हत्या केली.