सांगलीच्या कुपवाडमध्ये नवविवाहित गर्भवतीची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर...
सांगली : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच गर्भवती नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. या नवविवाहितेवर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू, सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कुपवाड पोलिसांत नोंद झाला.
ऋतुजा ऊर्फ गौरी सुकुमार राजगे असे त्या मृत विवाहितेचे नाव असून, तिचे वडील डॉ. चंद्रकांत पाटील (गुंडेवाडी, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली. कुपवाड पोलिसांनी या घटनेची गांभीयनि दखल घेत पतीसह तिघांना तत्काळ अटक केली. पती सुकुमार सुरेश राजगे (वय २९), सासू अलका सुरेश राजगे (वय ४९), सासरा सुरेश राजाराम राजगे (वय ५३, सर्व अश्विनी हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत. सध्या तिघेही पोलिस कोठडीत आहेत.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की मृत ऋतुजा हिचा विवाह सुकुमार राजगे याच्याशी २०२१ मध्ये झाला होता. सुकुमार हा मर्चेंट नेव्हीमध्ये सेकंड ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. लग्नात जावयाला साडेचार तोळ्यांची चेन, अंगठ्या असा मानपान केला होता. सुकुमार याच्यासह त्याचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे अनुकरण, प्रार्थना व रीतिरिवाजाप्रमाणे राहत असल्याचे ऋतुजा आणि तिच्या कुटुंबीयांना लग्नापर्यंत माहिती नव्हते. जून २०२१ मध्ये ऋतुजा हिला पहिला वटपौर्णिमेचा सण सासू अलका हिने साजरा करू दिला नाही. त्यानंतर सुकुमार हा कामावर निघून गेला.
हेदेखील वाचा : कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; गुन्हा दाखल करत…
दरम्यान, लग्नानंतरची पहिली दिवाळी सासरच्या मंडळींनी साजरी करू दिली नाही. ‘आमच्या घरात दिवाळी सण साजरा करत नाही. तू आमच्यासोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा,’ अशी संशयितांनी जबरदस्ती केली. तसेच ऋतुजा हिला स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करू दिला नाही. संशयितांनी तिला वारंवार त्रासही दिला. चर्चमध्ये प्रार्थना, पूजा करण्यासाठी वारंवार तगादा लावण्यात आला.
पतीकडून पत्नीला मारहाण
दरम्यानच्या काळात ऋतुजा गर्भवती राहिली. यावेळी ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार करू, असा दबावही तिच्यावर टाकण्यात आला. त्यानंतर पती सुकुमार याने मारहाणही केली. ऋतुजाच्या आत्महत्येपूर्वी वडिलांनी जावयासह सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सततच्या त्रासाला आणि दबावाला ऋतुजा वैतागली होती. अखेर शुक्रवारी (ता. ६) तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर खळबळ उडाली. वडिलांच्या फिर्यादीनंतर पतीसह तिघांनाही अटक करण्यात आली आहे.