कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; गुन्हा दाखल करत...
मोहोळ : मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धमकावून, कोयत्याचा धाक दाखवून झालेल्या जबरी चोरीसह तीन गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह अन्य दोन महिला व सहा पुरुषांवर मोहोळ पोलीस ठाण्यात तीन प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करत पोलीस कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३० मे रोजी मोहोळ वैराग रस्त्यावर येथील एकाला तिघांनी दुचाकीवर येऊन कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करून हातातील अंगठी व खिशातील रोख रक्कम काढून घेतल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता. मोहोळ शहर व परिसरातील सीसीटीव्ही तपासून त्यामधील संशयित आरोपींची ओळख पटवून गोपनीय बातमीदारांच्या मदतीने त्या गुन्ह्यामध्ये सोमनाथ धोंडीराम कोरे, राज मनोज पवार व एक विधी संघर्ष बालक (तिघेही रा. पंढरपूर) यांना अटक करण्यात आली.
तसेच ३ जून रोजी शेटफळ चौकामध्ये माळशिरस तालुक्यातील मेंढपाळांच्या कळपातील मेंढ्या चोरी प्रकरण पोलिसांनी तपास करत संशयित आरोपींची माहिती मिळवीत त्या गुन्ह्यात सुनील विजय भोसले (रा. संघदरी, ता. दक्षिण सोलापूर), करण दत्तात्रय गायकवाड (रा. दहिवडी ता. तुळजापूर) व लक्ष्मण राजकुमार काळे (रा. पाटकुल ता. मोहोळ) यांना अटक करून चोरीला गेलेली मेंढरे हस्तगत केली.
तसेच मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळ्यांच्या चोरी प्रकरणातही हेच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. या गुन्ह्यामध्ये आनंद सतीश शिंदे (रा. डोराळे ता. वैराग) हा फरार असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
यातील तिसऱ्या घटनेमध्ये बिटले (ता. मोहोळ) येथील यल्लमा देवीच्या यात्रेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला असता गोपनीय बातमीदाराच्या मदतीने माहिती घेऊन पाथरूड (ता. भूम जि. धाराशिव) येथील ननिता यासीनखान भोसले व सुनिता नानासाहेब पंडित या दोघींना अटक करून पुण्यात गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर यांच्यासह इतर पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.