जालना: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा संघर्ष पेटला आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्याला ओबीसी वर्गातून विरोध होताना पाहायला मिळतोय आणि राज्य सरकारच्या विरोधात ओबीसीची मोट बांधण्यासाठी राज्यभरात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे सभा घेत आहेत. सभा घेवून आव्हान देण्याचा प्रयत्न होत असताना काल त्यांची जालन्यातील नीलमनगर भागात गाडी पेटवण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला आहे. या घटनेने जालन्यात खळबळ उडाली आहे. नवनाथ वाघमारे हे लक्ष्मण हाके यांच्यासोबत राज्यभरात दौरा करत आहेत आणि हैदराबाद गॅझेटला विरोध करत आहेत.
रात्री गाडी कशी पेटवली ?
जालन्यातील निलम नगर भागात गाडी उभी होती. रात्री ११ वाजताच्या दरम्यान एकाने ज्वलनशील पदार्थ गाडीवर टाकण्याचा प्रयत्न केला. गाडीवर चारही बाजूने ज्वलनशील पदार्थ टाकला आणि गाडी पेटवून दिली. सुदैवाने गाडी उभी असल्याने गाडीत कोणीही नव्हते.
पोलीस ठाण्यात तक्रार
नवनाथ वाघमारे यांनी या विरोधात जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. त्याने गाडी जाळण्याचा प्रयत्न का केला ? त्याचा उद्देश काय होता? याचा तपास पोलिसांकडून घेतला जाईल मात्र या घटनेने खळबळ माजली आहे.
कोण आहेत नवनाथ वाघमारे?
नवनाथ वाघमारे हे ओबीसी आंदोलक आहेत. बारामतीतही त्यांनी धनगर आरक्षणसाठी आंदोलन केल होत. अंतरवली सराटीत त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात उपोषण केल होत. सध्या राज्यात ओबीसी सभांमधून हैदराबाद गॅझेटला विरोध करत आहेत.
मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर केला हल्ल्याचा प्रयत्न
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा समाजाच्या लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. सदावर्ते जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलकाच्या भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. सदावर्ते हे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाविरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळेच आज मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.