मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये चोरीची घटना (फोटो -istockphoto)
मुंबई: मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात शेजारी राहणाऱ्या एका दाम्पत्याने शेजारच्या घरातच साडेनऊ लाख रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करत यामध्ये तिघांना अटक केली असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत. शिवकुमार रॉय (३८) असे यातील तक्रारदार यांचे नाव असून ते मानखुर्द परिसरात राहतात. १७ मार्चला ते कामावर असताना त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करत घरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी घरी जाऊन पाहणी केली असता, घरातील कपाटात असलेली रोख रक्कम आणि काही सोन्याचे दागिने असा एकूण साडेनऊ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला होता.
तिघांना केली अटक
याबाबत त्यांनी तत्काळ ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी शिवकुमार राहत असलेल्या इमारतीमधील सर्व सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले. यावेळी शेजारी राहणारी महिला वैष्णवी गोदरे आणि तिचा पती राहुल गोदरे यांनी त्यांच्या घरात ही चोरी केली असल्याचे समोर आले.
चोरीची कबुली, चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत
■ गोदरे यांच्याकडे अनेकदा शिवकुमार यांची पत्नी घराची चावी ठेवून जात होती. याचाच फायदा घेत त्यांनी ही चोरी केली.
■ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी महिलेने हे सर्व दागिने तिच्या आईकडे दिले.
पोलिसांना तिने ही बाब सांगितल्यानंतर पोलिसांनी रिझवाना शेख हिला देखील ताब्यात घेऊन अटक केली आहे.
■ तसेच त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चेंबूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
चेंबूरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेट प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा युनिट-६ ने दोघांना अटक केली आहे. आफताब आलम रमजान अली अन्सारी आणि हरिलाल बंधू चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायदा (पीटा) आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोक्सो न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह चार मुलींची सुटका केली आहे. आता त्यांना देवनार महिला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.
चेंबूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक; मुलींची केली सुटका
गुन्हे शाखा युनिट-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितले की, आता ते या रॅकेटशी संबंधित इतर संबंधांची चौकशी करत आहेत आणि तस्करी नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवत आहेत. मुंबईत अनेक संघटित टोळ्या सेक्स रॅकेट चालवत असल्याचे वृत्त आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार अल्पवयीन मुलींसह तरुणींची तस्करी करून त्यांना विविध हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये पाठवले जाते. एका गुप्त माहितीवरून कारवाई करून, पोलिसांनी एका दलालाचा संपर्क क्रमांक मिळवला आणि बनावट ग्राहकाच्या मदतीने अल्पवयीन मुलींसह मुलींना वेश्याव्यवसायासाठी बोलावले.