पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या (फोटो सौजन्य: social media )
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता जुन्या वादातून विनोद देशमुख (रा. मशीतोला, घाटेटेमणी) या व्यक्तीची तलवारीने वार करून दोन आरोपींनी हत्या केली. यासंदर्भात रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात खुनातील आरोपींना अटक केली.
प्रशांत ऊर्फ लोकेश छनूलाल कावडे (२५) आणि कामेश चुन्नीलाल कवडे (२८, दोन्ही रा. गिरोला, ता. आमगाव) अशी आरोपींची नावे आहेत. देशमुख मंगळवारी (दि. १९) आपल्या फार्म हाऊसवर गेले होते. परंतु ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. बुधवारी (दि. २०) त्यांची पत्नी आणि गावकरी त्यांचा शोध घेण्यासाठी वनपरिक्षेत्रात गेले होते. जिथे त्याचा मृतदेह आढळून आला. अज्ञात आरोपींनी त्यांच्या डोक्यात शस्त्राने वार करून खून केला होता. याप्रकरणी हिरकणी विनोद देशमुख हिच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि हवालदारांच्या ३ पथकांची नियुक्ती केली. गुन्ह्याची माहिती घेतली. त्यांनी परिसरातील लोकांकडून घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींची माहिती गोळा केली आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी अथक प्रयत्न केले. यादरम्यान, आरोपी प्रशांत कावडे आणि कामेश कावडे यांना कालीमाटी गावातून ताब्यात घेतले.
दरम्यान, या सर्वांची पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. दोन्ही आरोपींना रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाणे यांच्या पथकाने केली.
वडिलांना केली लाठ्या-काठ्यांनी मारहाण
विनोदने आपल्या साथीदारांसह आरोपी प्रशांतच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या वडिलांना काठ्यांनी मारहाण केली. त्याच्याविरूद्ध आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विनोद हा आरोपीच्या गावी जायचा. तेथे त्याची वीटभट्टी आहे. त्यामुळे तेथे त्याचं येणं-जाणं सुरु होते.
विनोद गावात जाताच द्यायचा धमकी
विनोद गावात गेल्यावर तो दोन्ही आरोपींना शिवीगाळ करून धमकी द्यायचा. याच कारणावरून दोन्ही आरोपींनी 4-5 दिवसांपूर्वी विनोदच्या हत्येचा कट रचला आणि मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास गिरोला ते मशीटोला या पक्क्या रस्त्यावर त्याला थांबवून चेहऱ्यावर तिखट फेकले. त्याच्या डोक्यावर, पाठीवर आणि मानेवर लोखंडी तलवारीने हल्ला केला होता.